
आतापर्यंत आपण पालखीचे भोई होतो. पण यापुढे आपण पालखीचे भोई होणार नाही तर आता मी त्या पालखीत शिवसैनिकाला बसवणारच, असा वज्रनिर्धार शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज शिवसेना आमदारांसमोर व्यक्त केला. शिवसेना आमदारांचा सध्या मुक्काम मालाड (प.) येथील मढमधील हॉटेल द रिट्रिटमध्ये आहे. उद्धव ठाकरे यांनी हॉटेलमध्ये शिवसेना आमदारांची भेट घेऊन एक बैठकही घेतली. यावेळी शिवसेना नेते, युवासेना प्रमुख-आमदार आदित्य ठाकरे व सौ. रश्मी ठाकरेही उपस्थित होत्या.
शिवसेना आमदारांना मार्गदर्शन करण्यापूर्वी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आमदारांशी चर्चा केली. त्यानंतर आमदारांना मार्गदर्शन करताना ते म्हणाले की, आपली युती अजूनही कायम आहे. युती तुटलेली नाही. मात्र राज्यात शिवसेनेचाच मुख्यमंत्री असेल अशी ठाम भूमिका त्यांनी यावेळी मांडली. उद्धव ठाकरे यांच्या भूमिकेला सर्व आमदारांनी पाठिंबा दिला. सत्तास्थापनेच्या संदर्भात निर्णय घेण्याचे सर्व अधिकार उद्धव ठाकरे यांना देण्याचा ठराव शिवसेना आमदारांच्या बैठकीत यापूर्वीच घेण्यात आला आहे. त्यामुळे यापुढे उद्धव ठाकरे कोणती भूमिका घेतात याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.
आदित्य ठाकरेंचा मुक्काम
शिवसेना नेते-आमदार आदित्य ठाकरेही सर्व आमदारांसोबत रिट्रिट हॉटेलमध्ये शनिवारपासून मुक्कामाला आहेत. आदित्य ठाकरे यांनी सकाळी आमदारांशी चर्चाही केली.



























































