
राज्यात अजूनही सत्तास्थापनेचा पेच कायम असला तरी भाजपच्या मंत्र्यांनी मंत्रालयातल्या केबिनमधील सामानाची बांधाबांध सुरू केली आहे. भाजपच्या मंत्र्यांच्या दालनाबाहेर भाजपच्या पत्रकांपासून जुन्या फायलींचा गठ्ठा गोण्यांमध्ये बांधून नेण्याच्या तयारीत आहे.
विधानसभेची मुदत संपुष्टात आल्यावर आणि नवीन सरकार स्थापन होण्याच्या आधी मंत्र्यांची दालने रिकामी करण्याचे पत्रक सामान्य प्रशासन विभागाच्या वतीने जारी होते. पण सध्या काळजीवाहू सरकार असल्याने सामान्य प्रशासन विभागाने मंत्र्यांची दालने रिकामी करण्याचे पत्रक जारी केलेले नाही. पण तरीही भाजपच्या मंत्र्यांनी मंत्रालयातल्या दालनातील सामानाची बांधाबांध सुरू केली आहे. राज्यात भाजप सत्तेवर पुन्हा येण्याची शक्यता मावळल्याने भाजपच्या मंत्र्यांनी गाशा गुंडाळण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे भाजपच्या मंत्र्यांच्या दालनाच्या बाहेर सध्या कचऱयाचे साम्राज्य निर्माण झाले आहे. फाडलेली पत्रके, निवेदने, प्रचाराची पत्रके असा कचरा दालनाच्या बाहेर पडला आहे तर काही मंत्र्यांच्या दालनाबाहेर गोण्यांमध्ये मंत्र्यांचे सामान बांधून ठेवलेले दिसते.
अशी होणार बांधाबांध
नियमानुसार मंत्र्यांच्या दालनातील सरकारी मालमत्ता म्हणजे अगदी संगणक, कपाटे, टीव्ही असे सरकारी सामान सामान्य प्रशासन विभागाकडे जमा करावे लागते. केबिनच्या चाव्याही सामान्य प्रशासन विभागाकडे जमा कराव्या लागतात. नवीन मंत्रिमंडळ स्थापन होईपर्यंत सर्व मंत्र्यांना त्यांच्या केबिन रिकाम्या करून नवीन मंत्र्यांना वितरित करण्यासाठी तयार कराव्या लागतील. त्यादृष्टीने सामान्य प्रशासन विभागाने पावले उचलली आहेत. त्यामुळे भाजपच्या मंत्र्यांनी अतिशय जड अंतःकरणाने केबिन रिकाम्या केल्याचे मंत्रालयातील कर्मचाऱयांनी सांगितले.






























































