
मध्य रेल्वेच्या गर्दीच्या स्थानकांपैकी एक स्थानक असलेल्या ठाणे स्थानकात मेट्रोच्या धर्तीवरील सुरक्षा व्यवस्था राबवण्यात येणार असून कोणाही ऐऱयागैऱयाला येथे प्रवेश देणे बंद करण्यात येणार आहे. त्यामुळे आता प्रवाशांना ठाणे स्थानकात प्रवेश करण्यासाठी 31 मार्च 2020पासून किमान प्लॅटफॉर्म तिकीट तरी विकत घ्यावे लागणार आहे. ठाणे स्थानकातील सर्व बेकायदेशीर प्रवेशद्वारे बंद होणार असून त्यापैकी चार प्रवेश बंद करण्यात आले आहेत.
मध्य रेल्वेच्या सुरक्षा बलाने मध्य रेल्वेच्या ठाणे, कल्याण, लोकमान्य टिळक टर्मिनस, दादर आणि सीएसएमटी स्थानकाची सुरक्षा व्यवस्था वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्याची सुरुवात ठाणे रेल्वे स्थानकापासून होत आहे. ठाणे स्थानकाच्या पूर्वेकडे असलेल्या चोरवाटांमधून होणारा बेकायदेशीर प्रवेश रोखण्यात येणार आहे. ठाणे स्थानकात एकूण 22 प्रवेशद्वारे असून त्यातील सर्व बेकायदा प्रवेशद्वारे बंद होणार असून अधिकृत प्रवेशद्वारांपैकीदेखील चार प्रवेशद्वारे बंद करण्यात आली आहेत.
अशी असेल सुरक्षाव्यवस्था
मार्च 2020मध्ये ठाणे रेल्वे स्थानकात प्रवेश करण्यासाठी 10 दरवाजे असतील. स्थानकाच्या सर्व दरवाजांवर 24 तास 66 सुरक्षा कर्मचारी नेमण्यात येतील. ठाणे पूर्वेतील पाच आणि पश्चिमेकडील पाच असे एकूण 10 प्रवेशद्वारे ठेवण्यात येतील. त्यापैकी चार प्रवेशद्वारे पश्चिमेला व तीन पूर्वेला असतील. या सर्व गेटमध्ये डोअर फ्रेम मेटल डिटेक्टर बसवण्यात येतील. हे सर्व मेटल डिटेक्टर नेहमीपेक्षा आकाराने थोडे मोठे असतील, ज्यामुळे प्रवाशांना प्रवेश आणि बाहेर पडण्यास कोणतीही अडचण येणार नाही. याशिवाय सात अवैध प्रवेशद्वारे बंद करण्यात येतील. पूर्व आणि पश्चिमेकडील प्रवेशद्वारांवर सामानाची तपासणी करण्यासाठी पाच सुरक्षा तपासणी नाके बनवण्यात येणार आहेत.
ठाणे रेल्वे स्थानकातील चार प्रवेशद्वारे बंद केली आहेत. पूर्वेला संरक्षक भिंत बांधण्यात येणार आहे. यामुळे स्थानक व प्रवाशांची सुरक्षा अधिक चांगल्या प्रकारे करता येईल. तसेच अनावश्यक गर्दी हटून तिकिटांची विक्री वाढेल – के.के. अशरफ, वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त, आरपीएफ, मध्य रेल्वे



























































