लांबलेल्या पावसामुळे यंदा हापूस उशिरा, शेतकऱयांना मोठय़ा नुकसानीची शक्यता

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

 हापूसची चव खवय्यांना अक्षरशः वेड लावते. हापूसचा मोसम आला की त्याचे वेध लागतात. परंतु अस्सल खवय्यांसाठी एक दुःखद बातमी आहे. यंदा हापूस उशिरा बाजारात दाखल होणार आहे. लांबलेल्या पावसाचा फटका हापूसला बसणार आहे. हवामानातील बदलामुळे शेतकऱयांचे वांधे झाले असून यंदा त्यांना मोठे नुकसान सहन करावे लागण्याची शक्यता आहे.

ऑक्टोबरमध्येच कोकणातून पाऊस काढता पाय घेतो. ऑक्टोबर हीटमुळे जमीन तापते. मतलई वारे सुटतात. वापसा, मतलई वारे आणि थोडी थंडी अशा वातावरणात कलमांना मोहोर येण्यास अनुकूल परिस्थिती निर्माण होते. परंतु यंदा मोहोर येण्यास असे वातावरण अजूनही तयार झालेले नाही. किंबहुना आंब्यासाठी वातावरण प्रतिकूल आहे. मोहोरासाठी प्रतिकूल वातावरण असल्यामुळे यंदा आंब्याचा हंगाम लांबण्याची शक्यता आहे. प्रतिकूल वातावरणामुळे मोहोर येण्यास उशिरा झाले की फलधारणालाही विलंब होणार आहे. नोव्हेंबर सुरू झाला तरी थंडीचा मागमूस नाही. त्यामुळे मोहोर येण्याची प्रक्रिया डिसेंबरमध्येच होणार आहे. त्यानंतर पुढे आंबा तयार होण्यासाठी किमान 110 ते 120 दिवस लागतात. त्यासाठी यंदा मार्चच्या अखेरीस किंवा एप्रिलच्या पहिल्या आठवडय़ात आंबा तयार होईल असा अंदाज कृषीतज्ञ व्यक्त करत आहेत.