भाजपच्या ‘ऑपरेशन लोटस’ला तडाखा, कर्नाटकातील 17 बंडखोर आमदार अपात्रच!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
supreme_court

काँग्रेस आणि जेडीएसचे आमदार फोडून कर्नाटकात ‘ऑपरेशन लोटस’ राबविणाऱ्या भाजपला जोरदार तडाखा बसला आहे. 17 बंडखोर आमदारांना  अपात्र ठरविण्याचा विधानसभा अध्यक्षांचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवला आहे. अपात्रता अनिश्चित काळासाठी नसते असे मत व्यक्त करीत न्यायालयाने या आमदारांना विधानसभा निवडणूक लढविण्याची मुभा दिली आहे.

कर्नाटक विधानसभेचे तत्कालीन अध्यक्ष रमेश कुमार यांनी 17 बंडखोर आमदारांना अपात्र ठरविताना विधानसभा निवडणूक लढविण्यासही बंदी घातली होती. याविरुद्ध अपात्र आमदारांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. आमदारांच्या याचिकेवर 25 ऑक्टोबर रोजी सुनावणी पूर्ण झाल्यानंतर न्यायालयाने निर्णय राखून ठेवला होता. यावर न्यायमूर्ती एन. व्ही. रामन्ना, न्यायमूर्ती रंजीत खन्ना आणि न्यायमूर्ती कृष्णा मुरारी यांच्या खंडपीठाने महत्त्वपूर्ण निर्णय दिला.

काय आहे प्रकरण

  • जुलै महिन्यात भाजपने ‘ऑपरेशन लोटस’ राबविले. काँग्रेस आणि जेडीएसचे आमदार फोडले. 17 आमदारांनी भाजपला पाठिंबा दिला.
  • अल्पमतात गेलेले तत्कालीन काँग्रेस-जेडीएस सरकार गेले. विधानसभेत विश्वासदर्शक ठराव फेटाळल्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी राजीनामा दिला. भाजपचे बी. एस. येडियुरप्पा हे मुख्यमंत्री बनले.
  • कर्नाटक विधानसभेचे तत्कालीन अध्यक्ष रमेशकुमार यांनी काँग्रेस-जेडीएसच्या 17 बंडखोर आमदारांना अपात्र ठरविले आणि विधानसभेची मुदत संपेपर्यंत 2023 पर्यंत निवडणूक लढविण्यास बंदी घातली.
  • 17 पैकी 15 विधानसभा मतदारसंघांत 5 डिसेंबरला पोटनिवडणूक होणार आहे.

सर्व बंडखोरांना उमेदवारी देणार; भाजपची धाकधूक वाढली

सर्व 17 बंडखोर उद्या (दि. 14) भाजपमध्ये प्रवेश करतील असे मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी म्हटल्याचे ‘एनएनआय’चे वृत्त आहे. पोटनिवडणुकीत या बंडखोरांना भाजप उमेदवारी देण्याची शक्यता आहे. दरम्यान, उमेदवारीनंतरही पोटनिवडणुकीत हे बंडखोर पराभूत झाले तर कर्नाटकात पुन्हा राजकीय नाटय़ रंगू शकते. यामुळे भाजपची धाकधूक वाढली आहे.

न्यायालयाने काय म्हटले

  • 17 बंडखोर आमदारांना अपात्र ठरविण्याचा निर्णय योग्य असल्याचे स्पष्ट करतानाच न्यायालयाने तत्कालीन विधानसभा अध्यक्षांबाबत नाराजी व्यक्त केली. घटनेच्या चौकटीत राहून आपले कर्तव्य पार पाडले पाहिजे. सध्या त्याच्या विरोधात वागण्याचे प्रकार वाढत आहेत.
  • आमदाराला स्वेच्छेने राजीनामा देण्याची इच्छा असेल तर विधानसभा अध्यक्षांनी तो स्वीकारला पाहिजे. राजीनामा स्वीकारताना कोणतेही कारण दाखवणे घटनाबाह्य आहे.
  • आमदारांनी राजीनामा स्वेच्छेने दिला की कोणाच्या दबावाने दिला याची पडताळणी करण्याची बाब विधानसभा अध्यक्षांना अत्यंत मर्यादित आहे.
  • आमदार अपात्र ठरविण्याचा निर्णय मात्र योग्य आहे.