
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर 2011 मध्ये हल्ला करणाऱया आणि पोलिसांना मारहाण करणाऱया अरविंद सिंह ऊर्फ हरविंदर सिंह या फरार आरोपीला दिल्ली पोलिसांनी बुधवारी म्हणजेच तब्बल आठ वर्षांनी अटक केली. त्याच्या विरोधात कनॉट प्लेस आणि संसद मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल असून दोन्ही प्रकरणांत त्याला फरार घोषित करण्यात आले होते.
अरविंद सिंहने 2011 मध्ये कनॉट प्लेस येथील एनडीएमसीच्या कन्वेंशन हॉलमध्ये तत्कालीन कृषिमंत्री शरद पवार यांच्यावर हल्ला केला होता. याप्रकरणी त्याच्या विरोधात कनॉट प्लेस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याला अटकही करण्यात आली होती अशी माहिती पोलीस उपसंचालक ईश सिंघल यांनी दिली. शरद पवार यांच्यावरील हल्ला प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान सिंह गायब झाला होता. 29 मार्च 2014 रोजी पटियाला हाऊस कोर्टाने त्याला फरार घोषित केले होते. दरम्यान, अरविंद सिंहच्या मूळ पत्त्यावर अनेकदा छापा टाकण्यात आला. 11 नोव्हेंबर रोजी एसीपी अखिलेश्वर यादव यांच्या टीमला त्याच्या नव्या पत्त्याबाबत माहिती मिळाली. त्यानुसार सापळा रचून अरविंद सिंहवर झडप घालून त्याला अटक करण्यात आली.

























































