राजस्थानची राजधानी जयपूरमध्ये सीमा सुरक्षा दलाच्या एका जवानाने आपल्या कृतीतून समाजासमोर एक उत्तम उदाहरण ठेवले आहे. या जवानाने आपल्या लग्नात हुंडा घेण्यास स्पष्ट नकार दिला. विवाह मंडपात सासरहून समोर ठेवलेली 11 लाख रुपयांची रोकड घेण्यास त्याने विनम्रतेने नकार दिला आणि त्याऐवजी 11 रुपये आणि एक नारळ घेऊन हा विवाह संपन्न केला.
जयपूरमधील अंबा बारी भागात जीतेंद्र सिंह हा बीएसएफचा जवान राहतो. लग्नमंडपात मुलीच्या वडिलांनी 11 लाख रुपयांची रोकड ऑफर केली पण ती स्वीकारण्यास जीतेंद्र यांनी नकार दिला. विवाहसमारंभातील व्यवस्थेवर नाराज होऊन ते रक्कम नाकारत आहे. असे वधू पक्षाकडील लोकांना वाटले, मात्र कॉन्स्टेबल जीतेंद्र याने हुंडा घेणारच नसल्याचे स्पष्ट करताच वधूपक्षातील लोकांसह सर्वांचे डोळे भरून आले. या घटनेबद्दल बोलताना मुलीचे वडील गोविंद सिंह शेखावर म्हणाले, ‘मी आधी थोडा घाबरलो होतो आणि विचार केला की नवरदेव किंवा वराती कुठल्या तरी गोष्टीमुळे नाराज आहेत. पण नंतर मला कळले की वर आणि त्याच्या कुटुंबाचा हुंडय़ाच्या प्रथेला विरोध आहे.’
माझ्या होणाऱया पत्नीने एलएलबी आणि एलएलएम केले आहे आणि सोबत पीएच.डी.देखील करीत आहे असे मला कळल्यावर त्याचवेळी माझ्या आणि माझ्या कुटुंबाच्या अनुरूप आहे असे आम्हाला वाटले. ती विधीसेवेचीदेखील तयारी करीत आहे. त्यामुळे मी हुंडा नाकारण्याचे ठरवले आणि माझे कुटुंबही या निर्णयात माझ्या पाठीशी ठामपणे उभे राहिले. आम्ही लग्नाच्याच दिवशी आमचा निर्णय जाहीर करण्याचे ठरविले होते, असे जवान जीतेंद्र सिंह यांनी सांगितले.





















































