इस्रोचे ‘मिशन 2020’, ‘चांद्रयान -3’ नोव्हेंबरमध्ये झेपावणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

 सप्टेंबर 2019 मध्ये चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरण्याचे स्वप्न भंग झाल्यानंतर इस्रो ‘मिशन 2020’ अंतर्गत चंद्रयान-3 मोहीम हाती घेण्याची शक्यता आहे. नोव्हेंबर 2020 मध्ये चांद्रयान-3 चंद्राच्या दिशेने झेपावणार आहे.

 मागील चांद्रयान-2 मधील ऑर्बिटर चंद्रावर आपले काम चोख बजावत आहे. त्यामुळे मिशन 2020 मध्ये केवळ लॅण्डर आणि रोव्हर सहभागी होणार आहेत. ऑक्टोबरपासून इस्रोच्या मुख्य पॅनलसह तीन उपसमित्यांची चांद्रयान-3 वर बैठका झाल्या आहेत. नुकतीच समीक्षा समितीची बैठक पार पडली. या बैठकीत अन्य समित्यांनी केलेल्या शिफारशींवर चर्चा करण्यात आली. विविध समित्यांनी संचालन शक्ती, सेन्सर, इंजिनीयरिंगविषयी प्रस्ताव सादर केले. चांद्रयान-3 विषयी आतापर्यंत दहा महत्त्वांच्या विषयांवर चर्चा पूर्ण झाली आहे. ज्यात लँडिंग साइट, नेव्हिगेशन, लोकल नेव्हिगेशनचा समावेश आहे. इस्रो नवे लॅण्डर आणि रोव्हर तयार करीत आहे. लॅण्डरवर पेलोडची संख्या अद्याप निश्चित झालेली नाही.

इस्रोकडून बालदिनाच्या शुभेच्छा!

आपली जिज्ञासा कधी संपू देऊ नका. स्वप्ने कायम ठेवा. कारण त्यामुळेच तर आम्हाला दूर ब्रह्मांडाच्या सीमा गाठता आल्या, असे सांगत हिंदुस्थानी अंतराळ संशोधन केंद्राने (इस्रो) बालदिनानिमित्त लहान मुलांना ट्वीटच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या आहेत. आपल्या संदेशात इस्रोने एका लहान मुलीचा फोटोही शेअर केला आहे. गुगलनेही बालदिनाचे औचित्य साधत खास डुडल बनवले आहे.

–  चांद्रयान-2 च्या तज्ञ समितीने लॅण्डर सिस्टीमला अधिक चांगले बनविण्याच्या शिफारशींकडे लक्ष देण्याची सूचना केली आहे. एका वैज्ञानिकाने सांगितले,‘चांद्रयान-3’ची प्राथमिकता लॅण्डरचे पाय मजबूत करणे ही आहे. त्यामुळे लॅण्डर चंद्राच्या पृष्ठभागावर सहज उतरेल.