
>>विवेक दिगंबर वैद्य
श्रीस्वामीसमर्थ संप्रदायातील प्रख्यात शिष्यवर्य श्रीमयूरानंद सरस्वती यांच्या अवतारकार्याचा केलेला हा परिचय
श्री स्वामीसमर्थ महाराजांनी पहिल्या भेटीमध्येच मोरेश्वर जोशी यांच्यावर कृपेचा वर्षाव केला आणि त्यांना ‘प्रसाद’रूपाने श्रीगणेशमूर्ती व पितळी चौरंगावरील पादुका दिल्या आणि चरणांकित दगडी पादुका देऊन श्रीस्वामी म्हणाले, ‘मेलास की डोक्यावर ठेवण्यास सांग. जा सोपाऱयाला, आमची ध्वजा उभी कर. राममंदिराची स्थापना कर. तुझ्या घराण्यात सात पिढय़ा कीर्तन परंपरा राहील. निर्मळच्या यात्रेत मी तुला पुन्हा भेटेन आणि योग्यवेळी घरीदेखील येईन.’ मोरेश्वर रघुनाथ जोशी अक्कलकोट येथे गेले खरे मात्र, श्रीस्वामी साक्षात्कार घडताच तिथून माघारी, नालासोपाऱयास परतले ते साधकवृत्तीने राहण्यासाठी आणि पुढे ‘मयूरानंद सरस्वती’ नावाने ख्यातकीर्त होण्यासाठी.
मयूरानंद घरी आले तेव्हा श्रीस्वामींनी सांगितल्यानुसार खरोखरीच, पत्नी गोपिकाबाई अन्नपाणी वर्ज्य करून त्यांची वाट पाहत बसली होती. वृद्ध बापूही नातवाच्या प्रतीक्षेत होते. मयूरानंदांनी अक्कलकोटात घडलेला प्रसंग सांगितला तेव्हा घरातील सर्वांना आनंद झाला.
पुढे मयूरानंदांना कधी अक्कलकोटास जाण्याची गरज भासली नाही, कारण त्यांना वेळोवेळी श्रीस्वामीसमर्थांचे सगुण दर्शन घडत असे. काही दिवसातच मयूरानंदाना श्रीस्वामींच्या बोलण्याचा प्रत्यय येता झाला. एकदा सत्पाळा येथे श्रीहनुमान जयंतीच्या निमित्ताने मयूरानंदांना कीर्तनासाठी बोलावले. तेव्हापासून त्यांना विविध ठिकाणाहून कीर्तनासाठी आमंत्रणे येती झाली. मयूरानंदांचे कीर्तन श्रोत्यांना आवडू लागले अन् लोकांनी त्यांस मोरेश्वरबुवा ही उपाधी दिली. पाहता पाहता जोशी घराण्यात कीर्तनाची गादी-परंपरा सुरू झाली. आता त्यांच्यासाठी पुढील कार्य होते ते श्रीराममंदिराच्या उभारणीचे. मयूरानंद यांनी त्यांच्या निवासस्थानाजवळ पुरातन चक्रधरेश्वर मंदिराच्या शेजारी श्रीराममंदिर बांधण्याचे ठरविले. दरम्यान त्यांना श्रीराम-सीता-लक्ष्मण यांच्या मूर्ती अकल्पितरीत्या प्राप्त झाल्या. इतकेच नाही तर, पाया खणत असताना श्रीमारुतीरायांची मूर्तीदेखील सापडली. अशाप्रकारे, मयूरानंदांच्या हातून श्रीराममंदिराची निर्मितीदेखील पूर्ण झाली.
एकदा सकाळी नित्यकर्मात गुंतलेल्या मयूरानंदाच्या घरी यतीवेषधारी सिद्धपुरुष अचानक उभे ठाकले अन् म्हणाले, ‘अक्कलकोट स्वामींचे आपण शिष्य आहात असे समजल्यामुळे आपणांस भेटावयास आलो आहे.’ व त्यांनी मयूरानंदांकडे दौत-टाक आणि कागद मागितला. मयूरानंदानी त्यांना सर्व सामग्री दिली तेव्हा त्या यतींनी कागदावर औषधे तयार करण्याची कृती लिहून दिली आणि आपल्या झोळीतून एक नाणे बाहेर काढून त्या कागदासह मयूरानंदांकडे देत सांगितले, ‘यामध्ये काही विशिष्ट व्याधींवर उपयोगात येणारी औषधे, त्यांचे साहित्य, प्रमाण आणि कृती यांसहित लिहिलेली आहेत. या औषधांचा उपयोग गरजू रुग्णांसाठी पैशाची अपेक्षा न धरता करावा. सोबत हे नाणे घे. तुझ्या प्रपंचाचा योगक्षेम चालविण्याची जबाबदारी माझी आहे, तेव्हा काळजी करू नकोस.’ एवढे सांगून ते यतीवर्य अंतर्धान पावले. पुढे या दिव्य औषधीमुळे अनेक रुग्णांना फायदा झाला. अशा रीतीने श्रीस्वामींनी मयूरानंदांना दिलेले ‘त्यांच्या घरी येण्याचे वचन’ पूर्ण केले.
या खेरीज, श्रीस्वामीसमर्थ महाराजांनी ‘निर्मळच्या यात्रेत भेटण्याचे’ वचन दिले होते तेही अकल्पितरीत्या पूर्ण झाले. नालासोपारा येथे असलेले ‘निर्मळ’ हे गाव श्रीशंकराचार्यांचे समाधीस्थान म्हणून सर्वत्र सुपरिचित आहे. याच निर्मळ गावी यात्रेचे पूर्वापार आयोजन करण्यात येते. मयूरानंद यात्रेमध्ये कीर्तनासाठी गेले होते. कीर्तन पार पडल्यावर घराकडे परतताना त्यांना एका दुकानात चंदनाची उटी व बिल्वपत्र ठेवलेला ‘बाण’ दिसला. मयूरानंदांनी दुकानदाराकडे बाणाची मागणी केली, तेव्हा तो दुकानदार साधू म्हणाला, ‘हा चंद्रशेखर बाण माझा ‘आत्मा’ आहे. येथे अन्य उत्तम प्रकारचे बाणही विक्रीrसाठी आहेत. त्यातील एखाद्या बाणाची मागणी कर. ते मी तुला देऊ शकेन.’ मात्र, मयूरानंद त्याच बाणावर अडून बसले. बराच वादविवाद झाला. अखेर दुकानदार साधू म्हणाला, ‘मी तुझी परीक्षा घेईन. तू परीक्षेत उत्तीर्ण झालास तरच हा बाण तुला देईन. मी हे बेलाचे पान तुझ्या दिशेने फेकेन. ते जर तुझ्या उपरण्यात पडले तरच हा बाण तुला देईन.’ साधूने बिल्वपत्र फेकले आणि ते मयूरानंदांच्या उपरण्यात पडले. आता बाण द्यावा तर साधूने तो उचलून धुनीत टाकला आणि म्हणाला, ‘बेटा, तेरा तकदीर अच्छा होगा तो ये टुटेगा नही।’ थोडय़ा वेळाने धुनीतून बाण बाहेर काढला तेव्हा तो लालबुंद झाला होता. मात्र साधूने या वेळीही तो बाण मयूरानंदाना न देता जवळच पाण्याच्या पात्रामध्ये टाकला. साधूचा हा खेळ मयूरानंद विस्मयचकीत होऊन पाहात राहिले. काचेची वस्तू अग्नीत लालबुंद तापवून पाण्यात सोडली असता तडकते, पण आश्चर्य म्हणजे तो बाण सुरक्षित होता. त्यावर तो दुकानदार साधू हसत म्हणाला, ‘बेटा, आता तुला भय नाही. तुझे व तुझ्या वंशजांचे भाग्य उज्ज्वल आहे. हा बाण मी तुला देतो, तो नित्यपूजेत ठेव.’
मयूरानंद घडल्या प्रकाराने आनंदित झाले. चंद्रशेखर बाण ‘प्रसाद’ रूपाने प्राप्त करून ते काही अंतर पुढे गेले असतील तोच त्यांना श्रीस्वामी महाराजांचे ‘निर्मळच्या यात्रेत भेटण्याचे’ वचन आठवले. चटकन त्यांनी मागे वळून पाहिले तेव्हा त्यांना तो दुकानदार साधूही दिसला नाही आणि त्याचे दुकानही कुठे दिसले नाही. हे लक्षात येताच मयूरानंदांना श्रीस्वामी समर्थांनी दाखविलेली लीला उमगली.
एकीकडे कठोर साधना तसेच नित्य ईश्वरचिंतन आणि कीर्तनात मग्न राहणाऱया मयूरानंदामधील विभूतीमत्व सर्वांना कळून आले होते. मयूरानंदाच्या वाक्सिद्धीची प्रचीती अनेकांना येती झाली. मयूरानंद जनमानसांत मिसळत असत. त्यांच्या सहजसाध्य लाघवी स्वभावामुळे पंचक्रोशीत प्रसिद्धीस आलेले मयूरानंद श्रीरामजन्मोत्सव आणि पालखी समारोपाला स्वतः कीर्तनासाठी उभे राहात असत. एकदा नवमीचे कीर्तनासाठी मयूरानंदांनी त्यांच्या मुलाला, गोविंदबुवांना आपल्या मागे उभे राहण्यास सांगितले आणि त्याच कीर्तनामध्ये ‘आज जसे इथे जमले आहात, तसेच पुढील वर्षी यावे. तेव्हा आम्ही नसू, कारण पुढील अष्टमीला आम्ही समाधिस्थ होत आहोत.’ मयूरानंदांचे निर्वाणीचे बोल ऐकून त्यांच्यावर माया करणारे भक्तगण हेलावले. त्या दिवशी मयूरानंदांनी सर्वांना स्वहस्ते सुंठवडा वाटला.
श्रीमयूरानंद सरस्वती यांनी त्यांचे सांगणे खरे करून दाखविले. पुढील वर्षी, अष्टमीस ‘श्रीस्वामीसमर्थ’ या नामगजरात श्रीमयूरानंद सरस्वती, श्रीस्वामींचरणी विलीन झाले. श्रीराममंदिरालगतच्या गुहेत मयूरानंदांचा समाधिस्थ देह ठेवण्यात आला. गुहा बंद करून त्यावर श्रीस्वामीसमर्थांनी दिलेल्या दगडी पादुका ठेवण्यात आल्या. तिथे श्रीगोविंदबुवांनी श्रीदत्तात्रेयांची मूर्तीही स्थापन केली. प्रत्येक श्रीस्वामीभक्ताने मुंबई नजीकच्या नालासोपारा येथील उमराळे गावात असलेल्या श्रीमयूरानंद सरस्वतींच्या समाधीची दर्शनभेट घ्यायलाच हवी.
(उत्तरार्ध)




























































