25 नोव्हेंबरला ‘कार्टोसैट-3’चे लाँचिंग, सैन्य सुरक्षेसाठी महत्त्वाची भूमिका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

चांद्रयान-2 नंतर इस्रो आता नव्या मिशनची तयारी करीत आहे. आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथून 25 नोव्हेंबरला सकाळी 9 वाजून 28 मिनिटांनी ऍडव्हान्स रिमोट सेंसिंग सॅटेलाइट ‘कार्टोसैट-3’ लाँच करणार आहे. यासोबतच अमेरिकेचे 13 छोटे व्यावसायिक उपग्रहही अंतराळात पाठविण्यात येणार आहेत.

पीएसएलव्ही-सी 47 या रॉकेटमधून हे लाँचिंग पार पडणार आहे. कार्टोसैटचा उपयोग हवामान आणि सैन्याशी संबंधित माहिती मिळविण्यासाठी होणार आहे. कार्टोसैट-3 चे वजन सुमारे दीड हजार किलोग्रॅम असून ते अर्थ इमेजिंग सॅटेलाइटमधील पहिल्या श्रेणीतील सॅटेलाइट आहे.

जपानसोबत चांद्रयान-3चे लँडिंग 

पुढील वर्षी नोव्हेंबर 2020 मध्ये इस्रो जपानसोबत चांद्रयान-3चे लँडिंग करण्याची योजना आखत आहे. त्यासाठी इस्रोने एक उच्चस्तरीय समिती तयार केली आहे. या समितीचे नेतृत्व थिरुवनंतपुरम येथील विक्रम साराभाई स्पेस रिसर्च सेंटरचे संचालक एस. सोमनाथ करीत आहेत. या सेंटरला इस्रोच्या सर्व लाँचिंग प्रोग्रॅमची जबाबदारी देण्यात आली आहे.