
जिह्यातील उन्हाळ कांदा संपत आला असून येवला, सटाणा बाजार समितीत आज या कांद्याला 6600 रुपये प्रतीक्विंटल इतका उच्चांकी दर मिळाला आहे. अवकाळी पावसामुळे लाल कांद्याचे मोठे नुकसान झाले आहे. परिणामी, नोव्हेंबरच्या तिसऱ्या आठवडय़ातही फारच कमी प्रमाणात हा कांदा बाजारात दाखल झाला आहे. त्यातच उन्हाळी कांदाही संपत चालल्याने, तसेच मागणीपेक्षा आवक फारच कमी असल्याने जिह्यातील बाजार समित्यांमध्ये उन्हाळ कांद्याचा भाव वधारला आहे. येवल्यात आज कमाल दर 6601, सटाण्यात 6600 रुपये प्रतिक्विंटल असा मिळाला. पिंपळगावला 6561, नामपूर, निफाडला 6500, सायखेडय़ात 6260, चांदवडला 6226 रुपये प्रतिक्विंटल दर होता. इतर बाजार समित्यांमध्ये कमाल दर 5500च्या पुढे, तर सरासरी दर 5500 ते 6301 रुपये प्रतिक्विंटल असे मिळाले.





























































