अजय देवगण आणि सिद्धार्थ मल्होत्रा विनोदी चित्रपटासाठी पहिल्यांदाच एकत्र येणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सिद्धार्थ मल्होत्रा सध्या प्रचंड खूश आहे. त्याचा चित्रपट मरजावां ( Marjaavaan )हा बॉक्स ऑफिसवर बऱ्यापैकी कमाई करत आहेत. कारगिल युद्धात अतुलनीय शौर्य गाजवणाऱ्या विक्रम बात्रा यांच्या जीवनावर आधारीत चित्रपटामध्ये तो मुख्य भूमिकेत आहे.इंद्र कुमार यांच्या आगामी विनोदी चित्रपटात भूमिका मिळाल्याने सिद्धार्थचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. त्यातही त्याच्यासाठी आनंदाची बातमी ही आहे की या चित्रपटात तो अजय देवगणसोबत काम करणार आहे.

आय़ुष्याबाबत हलक्याफुलक्या पद्धतीने संदेश देण्याचा या चित्रपटामध्ये प्रयत्न केला जाणार आहे. या चित्रपटाचं कथानक सिद्धार्थने वाचलं असून त्याने लागलीच चित्रपटाला होकार दिला आहे. या चित्रपटाच्या चित्रीकरणाला पुढच्या वर्षी सुरूवात होणार आहे. डेन्मार्कमधल्या एका चित्रपटाचा हा रिमेक असून यामध्ये एक प्रौढ व्यक्तीचीही भूमिका असणार आहे. ही भूमिका अजय देवगण साकारणार असल्याचं निश्चित झालं आहे.

या चित्रपटाची कथा घेऊन इंद्रकुमार पहिले अजय देवगण यांच्याकडे गेले होते. कथा ऐकल्यावर अजयने त्यासाठी आपण तयार असल्याचं सांगितलं. सामाजिक संदेश देण्याचा या चित्रपटातून प्रयत्न केला जाणार असून त्याला विनोदाचा तडकाही देण्यात येणार आहे. अजय देवगण चित्रीकरणाला केव्हा सुरूवात करणार हे निश्चित झाले नसले तरी तो आणि सिद्धार्थ मल्होत्रा हे दोघे या चित्रपटात मुख्य भूमिका साकारणार असल्याचं निश्चित झालं आहे. अजय देवगण हा सध्या ‘मैदान’, एस.एस.राजामोली यांचा ‘RRR’ आणि ‘भुज’ या चित्रपटांच्या चित्रीकरणात व्यस्त आहे. तर सिद्धार्थ मल्होत्रा हा देखील दोन चित्रपटांच्या चित्रपटांच्या चित्रीकरणात व्यस्त आहे.