
भाजपने पळवलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका आमदाराला शिवसेनेने शोधून काढून आज सायंकाळी पुन्हा शरद पवार यांच्या ताब्यात दिले. मुंबई विमानतळाजवळील सहार हॉटेलमधून या आमदाराला शिवसेनेने ताब्यात घेतले.
या आमदाराचे नाव आहे संजय बनसोड. अजित पवार यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक आमदार भाजपमध्ये सामील झाले आहेत. त्यातील काही आमदार स्वतःहून पवारांकडे परत आले. आपली दिशाभूल करून आपल्याला राजभवनावर नेण्यात आले होते असे त्यांनी जाहीर पत्रकार परिषदेत कबूल केले. त्यानंतर राष्ट्रवादीने आपल्या संपर्कात नसलेल्या आमदारांशी संपर्क साधण्यास सुरुवात केली, परंतु आमदार बनसोड हे ‘नॉट रिचेबल’ झाले होते.
आमदार बनसोड हे सहार हॉटेलमध्ये असल्याची माहिती शिवसेना नेते एकनाथ शिंदे आणि शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांना आज सायंकाळी मिळाली. त्यांनी तातडीने सहार हॉटेल गाठून बनसोड यांना ताब्यात घेतले आणि हॉटेल ललित येथे आणून भाजपने केलेल्या अपहरणाबद्दल त्यांची विचारपूस केली. त्यानंतर नार्वेकर यांनी बनसोड यांच्याबाबत शरद पवार यांना कळवले.
शरद पवार यांच्या सूचनेवरून माजी आमदार शशिकांत शिंदे हे हॉटेल ललितमध्ये पोहोचले. त्यानंतर एकनाथ शिंदे आणि मिलिंद नार्वेकर यांनी शशिकांत शिंदे यांच्यासह बनसोड यांना कारमध्ये बसवले आणि कडक सुरक्षा व्यवस्थेत थेट यशवंतराव चव्हाण सेंटर गाठून पवारांच्या ताब्यात दिले.
























































