बिबट्यापासून संरक्षणासाठी भांडुप संकुलाला सुरक्षा भिंत, पालिका करणार 37 कोटींचा खर्च

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
leopard

बिबट्यापासून संरक्षणासाठी भांडुप संकुलाला पालिकेने मजबूत संरक्षक भिंत बांधण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे वारंवार बिबट्या दिसत असल्याने भीतीच्या छायेखाली असणार्‍या शेकडो रहिवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. पालिका या कामासाठी 37 कोटींचा खर्च करणार आहे.

भांडुप संकुल येथे पालिकेचे जलशुद्धीकरण केंद्र व मोठी पाणी साठवण क्षमता असलेली टाकी आहे. येथील पालिका वरिष्ठ अधिकारी वसाहतीच्या ठिकाणी पडलेल्या भिंतीच्या भागातून बिबट्या वारंवार आतमध्ये येण्याचे प्रमाण वाढले. येथे अस्तित्वात असलेली दगडी भिंत 2018च्या पावसाळ्यात पडली आहे.  त्यामुळे या ठिकाणाहून बिबट्या लोकवस्तीत येत असल्याने रहिवाशांची तारांबळ उडते. या पार्श्वभूमीवर स्थानिक रहिवासी, नगरसेवक यांच्याकडून या ठिकाणी संरक्षक भिंत बांधण्याची मागणी करण्यात येत होती. त्यामुळेच या ठिकाणी संरक्षक भिंत बांधण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या कामात तुळशी जलवाहिनी रस्ता खिंडीपाडा ते तुळशी गेट आणि राजारामवाडी येथे खिंडीपाडा बोगद्यालगत आरसीसी भिंत बांधणे, वरिष्ठ अधिकारी वसाहत येथे कंपाऊंड भिंत बांधणे, रस्ता व नाल्यांचे कामही करण्यात येणार आहे. तसेच राजारामवाडी खिंडीपाडा बोगद्यालगत साईबाबा मंदिरासमोरील अस्तित्वात असलेली दगडी भिंतही 2016 च्या पावसाळ्यात भूस्खलन झाल्याने पडली होती. त्यामुळे या ठिकाणीही संरक्षक आरसीसी भिंत बांधण्यात येणार आहे.

रस्ता खचण्याचा धोकाही टळणार

भांडुप संकुल येथील तुळशी जलवाहिनी रस्ता हा खिंडीपाडा गेटपासून तुळशी गेटपर्यंत अस्तित्वात आहे. या रस्त्यालगत 2014 मध्ये नवीन जलशुद्धीकरण केंद्र उभारण्यात आले आहे. या प्रकल्पाची सीमा रस्त्याच्या शेजारी असून रस्त्याच्या पातळीपासून जलशुद्धीकरण केंद्राचा अंतर्गत रस्ता अंदाजे 10-12 मोटर खोलीवर आहे. या प्रकल्पाच्या बांधकामामुळे एक बाजूला साधारण 10-12 मीटर उंचीची तीव्र उताराची टेकडी निर्माण झाली असून या टेकडीच्या वरील भागावरून तुळशी गेटला रस्ता जातो. या उतारामुळे तेथील पृष्ठभागाचे भूस्खलन दरवर्षी पावसाळ्यात होत असते. त्यामुळे वरून जाणारा तुळशी गेट रस्ता खचला जातो व खालच्या जलशुद्धीकरण केंद्राच्या अंतर्गत रस्त्यावर माती जमा झाल्याने धोका आणि गैरसोय निर्माण होते. या पार्श्वभूमीवर दोन्ही रस्त्यांमध्ये आरसीसी भिंत बांधण्यात येणार आहे.