अयोध्या निकाल देशाने एकतेचा संदेश दिला! ‘मन की बात’मध्ये मोदींनी केले कौतुक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अयोध्येतील श्रीरामजन्मभूमी प्रकरणाच्या निकालानंतर 130 कोटी हिंदुस्थानींनी देशहिताला सर्वोच्च प्राधान्य देत शांतता राखली आणि एकतेचा संदेश दिला, असे कौतुकोद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काढले. मोदी यांनी आज 59व्या ‘मन की बात’मध्ये अयोध्या निकालासह एनसीसी दिवस, आर्म्ड फोर्सेस फ्लॅग डे आणि फिट इंडिया मूव्हमेंटच्या योगदानाबद्दलही समाधान व्यक्त केले. या ऐतिहासिक निर्णयानंतर देशाने एका नव्या ऊर्जेने, नव्या आशाआकांक्षेने, नव्या ध्येयाने वाटचाल करायला सुरुवात केली आहे, असेही मोदी म्हणाले.

एनसीसी दिनानिमित्तही त्यांनी एनसीसीतील मुलांबरोबर संवाद साधला. यावेळी त्यांनी ते एनसीसीत असताना पतंगाच्या मांजात अडकून पडलेल्या पक्ष्याला वाचवण्यासाठी झाडावर चढल्याचा किस्सा मुलांना सांगितला. आर्म्ड फोर्सेस फ्लॅग डेनिमित्त त्यांनी सैनिकांबद्दल कृतज्ञता व्यक्त करत वीर जवानांचे आभार मानले.

निरोगी आरोग्यासाठी ‘फिट इंडिया मूव्हमेंट’
‘फिट इंडिया मूव्हमेंट’साठी सीबीएसईद्वारा फिट इंडिया मूव्हमेंट आठवडा साजरा करण्यात आला. त्याचे त्यांनी कौतुक केले. या मोहिमेत लहानांपासून मोठय़ांनीही सहभागी होत देशाला निरोगी राहण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी केले. दरम्यान, देशाच्या राज्यघटनेला 26 नोव्हेंबरला 70 वर्षे पूर्ण होत आहे. त्या पार्श्वभूमीवर 26 नोव्हेंबरला देशभरात राज्यघटना दिवस साजरा केला जाणार आहे. संसदेतही यावरून विशेष अधिवेशन बोलावण्यात येणार आहे, असेही मोदी म्हणाले.