हिंदुस्थानात ई-सिगारेटवर बंदी लोकसभेत विधेयक मंजूर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ई-सिगारेटवर बंदी घालणारे विधेयक बुधवारी  लोकसभेत आवाजी मतदानाने मंजूर करण्यात आले. या विधेयकाचे कायद्यात रूपांतर झाल्यानंतर ई-सिगारेटचे उत्पादन, आयात आणि विक्री गुन्हा ठरणार आहे. सप्टेंबर महिन्यात या संदर्भातील अध्यादेश काढण्यात आला होता.

तंबाखूमुक्त व ई-सिगारेटमुक्त हिंदुस्थानची सर्वपक्षीय हाक लोकसभेत देण्यात आली. ई-सिगारेटने समाज व्यसनाधीन होत असून शालेय विद्यार्थ्यांनाही त्याची चांगलीच लागण झाली आहे. एका शाळेत छापा मारल्यानंतर तिथे 150 ई-सिगारेट आढळले. एक डॉक्टर म्हणून माझ्यासाठी हे वेदनादायी आहे. अनेक गंभीर आजारांवर मी आजवर शस्त्रक्रिया केल्या आहेत.  असे केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी लोकसभेत यासंदर्भातील संशोधन विधेयक मांडताना सांगितले.

सिंगापूरसारख्या शिक्षित देशामध्ये तिथल्या सरकारला ई- सिगारेटवर पूर्णपणे बंदी घालता आली नाही. हिंदुस्थानातल्या समस्या तर पुष्कळ वेगळ्या आहेत. मुळात प्रश्न मानसिकतेचा आहे, अशा वेळी हिंदुस्थानात ई-सिगारेटवर बंदी घालणे कसे शक्य होणार आहे, असा सवाल विचारत भाजपच्याच निशिकांत दुबे यांनी सरकारला घरचा आहेर दिला, तर भाजपचे दुसरे एक खासदार तेजस्वी सूर्या यांनी 2025 पर्यंत तंबाखूमुक्त हिंदुस्थान करायचा असेल तर शेतकऱयांना तंबाखूसारख्या नगदी पिकाऐवजी इतर चांगले उत्पन्न देणाऱया पिकाचा पर्याय मिळवून द्यायला हवा, असे मतप्रदर्शन केले. बसपाच्या रितेश पांडे यांनी हिंदुस्थानात ई-सिगारेटवर जरूर बंदी घाला, मात्र त्याचे उत्पादन थांबवू नका. त्यामुळे देशाला चांगला महसूल मिळेल. बाहेर देशात हे ई-सिगारेट विकले तर बिघडले कुठे, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

संकट ओळखून हिंदुस्थानचे पाऊल

ई-सिगारेटमुळे अमेरिकेसारखे देश बरबाद होत आहेत. हिंदुस्थानपुढचे ई-सिगारेट हे मोठे संकट असेल. त्यामुळेच ई-सिगारेटवरील बंदीचा अध्यादेश सरकारने तातडीने आणला, असे केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.