प्रलंबित सोलार पंपाच्या मागणीसाठी शेतकऱ्यांचा आत्मदहनाचा इशारा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

परभणी येथे मागील सहा महिन्यापासून सोलार पंपाची अर्धवट काम केल्याने शेतकऱ्यांच्या हातचा खरीप हंगाम गेला. आता रब्बी हंगामही जाणार असल्यामुळे नैराश्यग्रस्त झालेल्या परभणी जिल्ह्यातील 21 शेतकऱ्यांनी आत्मदहनाचा इशारा दिला आहे. सदर खाजगी सोलार कंपनी जळगावची असून किशोर डाके नावाच्या उद्योजकाने देशातील 7 राज्यात सोलार पंप बसविण्याचे काम घेतल्यामुळे त्याला परभणी जिल्ह्याकडे लक्ष द्यायला अजिबात वेळ नाही.

देशाचे माजी पंतप्रधान अटल बिहार वाजपेयी यांच्या नवाने मोठा गाजावाजा करत केंद्र सरकारने शेतकऱ्यांना सवलतीच्या दरात सुरु केलेल्या ‘अटल सौर कृषीपंप योजना-2’ या योजनेद्वारे शेतकऱ्यांना कृषीपंप देण्यासाठी गतवर्षी अर्ज मागविण्यात आले होते. त्यानुसार 31 मार्च 2019 पूर्वी अर्ज भरून घेण्यात आले. नियमानुसार शेतकऱ्यांकडून या सोलार पंपासाठीचा वाटाही रोख भरुन घेण्यात आला. त्यानंतर जळगाव येथील भाजप नेता किशोर डाके यांच्या ‘सोयो सिस्टीम’ या खाजगी सोलार कंपनीला शेतकऱ्यांच्या शेतावर सोलारपंप बसविण्याचे कंत्राट देण्यात आले. या कंपनीने देशातील 7 राज्यातील सोलार पंप बसविण्याचे काम शासनाकडून घेतले आहे. क्षमतेपेक्षा जादा काम कंपनीने घेतल्याने हा गोंधळ उडाला आहे. या खाजगी प्रारंभी कंपनीने तातडीने शेतकऱ्यांच्या शेतावर अर्धवट काम केले. त्यानंतर मात्र या कंपनीने अर्धवट राहिलेल्या कामाकडे ढुंकुनही पाहिले नाही. शेतकऱ्यांनी वारंवार सदर सोलार कंपनीशी संपर्क साधला परंतु कंपनी दाद लागू देत नाही. रितेश माळी नावाचा व्यवस्थापक शेतकऱ्यांशी आरेरावीने बोलतो. शेतकऱ्यांशी उद्धट बोलल्यामुळे शेतकरी निराश झाले आहेत. काही शेतकऱ्यांनी सोलार कंपनीचे मालक किशोर डाके यांच्याशी संपर्क साधला परंतु उपयोग झाला नाही. शेतकऱ्यांना या प्रकरणी सोलार कंपनी अजिबात प्रतिसाद देत नसल्यामुळे तब्बल सहा महिन्यापासून शेतकऱ्यांच्या शेतावर उभारण्यात आलेले अर्धवट ‘इंन्फ्रास्ट्रक्चर’ सांभाळण्याचा भुर्दंड सोसावा लागत आहे. जिल्हा प्रशासन सुद्धा या प्रकरणी हतबल झालेले दिसून येत आहेत. यामुळे जिल्ह्यातील 21 शेतकरी वैतागले असून त्यांची मानसिकता आता आत्महत्येच्या विचाराकडे वळली आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी शासन पातळीवर आणि सामाजिक पातळीवर प्रयत्न चालू असतानाच एका खाजगी सोलार कंपनीने मात्र अर्धवट कामाने त्रस्त शेतकऱ्यांना आत्महत्येच्या वळणावर आणून सोडले आहे. बहुदा यामुळेच 21 शेतकऱ्यांनी सदरील प्रलंबित सोलार पंप तातडीने न बसविल्यास आत्मदहनाचा इशारा दिला आहे. या संदर्भातील लेखी निवेदन नवनिर्वाचित मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे या 21 शेतकऱ्यांनी पाठविले आहे.

परभणीतील मागासवर्गीय महिला शेतकरी सौ. मनिषा मस्के, डॉ. सुधीर काकडे या शेतकऱ्यांशी या प्रलंबित सोलार पंपाबाबत संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, 3 एचपीचे सोलार पंप बसविण्याठी आम्ही वारंवार सोलार कंपनीशी संपर्क साधला. प्रारंभी गोडबोलून वेळ मारुन नेण्यासाठी कंपनीने आज-उद्या काम पूर्ण होईल, अशी आश्वासने दिली. त्यासाठी कंपनीने बहुदा खास बोलघेवडी मानसे ठेवली असावीत. शेतकरी सतत पाठपुरवा करत होते. खाजगी सोलार कंपनी मात्र दाद लागू देत नाही. अर्धवट काम करून सहा महिने उलटले आहेत. आम्ही त्रस्त शेतकरी अखेर परभणीचे जिल्हाधिकारी पी. शिवाशंकर यांच्याकडे जाऊन आपली कैफीयत मांडली. परंतु उपयोग झाला नाही. शेवटी दुसऱ्यांदा जिल्हाधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार करण्यात आली. त्या तक्रारीला सुद्धा आज पंधरा दिवस उलटले आहेत. बहुदा जिल्हा प्रशासन हे या प्रकरणी हतबल ठरले असावेत.

अरेरावीची भाषा
खाजगी कंपनीचा रितेश माळी नावाचा अधिकारी सातत्याने अरेरावीची भाषा करत आहे. शेतकऱ्यांनी फोन केल्यानंतर आधी फोन उचलतच नाही. उचलला तर कार्यालयीन वेळेत फोन करा, असे सुनावतो. तसेच ‘मी माझ्या पद्धतीने काम करीन, तुम्हाला काय करायचे ते करा…’ अशी उद्धट उत्तरे देतो. त्यामुळे शेतकऱ्यांचा नाविलाज झाला आहे. खरीप हातचा गेला आहे. रब्बी हंगामाच्या पेरण्या चालू आहेत. शेतकऱ्यांना सोलार पंपाची नितांत गरज आहे. वारंवार संपर्क साधूनही सोलारपंप बसत नाही. जिल्हा प्रशासन म्हणून जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केल्यानंतर तेथूनही काम होत नसल्याने शेतकरी वर्गातून निराशा व्यक्त होत आहे.

शेतकऱ्यांनी पैसे भरले
सोलार पंपासाठी शेतकऱ्यांकडून नियमानुसार पैसे भरून घेण्यात आले. केवळ आठ दिवसात पूर्ण काम केले जाईल, असे आश्वासन खासगी सोलार कंत्राटदाराने अर्धवट काम करताना दिले होते. परंतु त्या आश्वासनाचा विसर पडला आहे. कंपनी अर्धवट काम केल्यानंतर पून्हा शेतकऱ्यांकडे फिरकली नाही. शेतकऱ्यांचा कोणताही दोष नसताना त्यांना सोलारपंप बसवून मिळत नाही. कुणालाही याची जाणिव नाही. शेतकऱ्यांना अक्षरश: सोलार कंपनीने वाऱ्यावर सोडले आहे.