
भक्तिसंगीताने घराघरात पोहचलेल्या एका प्रसिद्ध गायिकेच्या घरी चोरी करणाऱ्या पुजाऱ्याला खार पोलिसांनी अटक केली. त्याला न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
तक्रारदार हे गायिकेकडे स्वीय सहायक म्हणून काम करतात. तीन दिवसांपूर्वी गायिकेच्या खार येथील घरातल्या देवाचे दागिने नसल्याचे तक्रारदाराच्या निदर्शनास आले. त्याने याची माहिती गायिकेला दिली. सात लाख रुपये किमतीचे दागिने गायब झाल्याने त्यांनी घरात शोध घेतला. त्या दिवशी घरात फक्त पुजारीच आला होता. त्यामुळे गायिकेने दागिन्यांबाबत पुजाऱयाकडे चौकशी केली. त्याने दागिन्यांबाबत माहिती नसल्याचे सांगितले. त्यानंतर गायिकेने खार पोलीस ठाण्यात धाव घेतली.
पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. पोलिसांनी पुजाऱ्याची चौकशी केल्यावर त्याने दागिने मित्राकडे दिल्याचे पोलिसांना सांगितले. चोरीचे दागिने अद्याप हस्तगत केलेले नाहीत.



























































