गणेश उपाध्याय नवोदित ‘मुंबई श्री’चा मानकरी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कांदिवलीत रंगलेल्या नवोदित ‘मुंबई श्री’ या मानाच्या शरीरसौष्ठव स्पर्धेत नवा स्टार उदयाला आला. कोणाच्या खिजगणतीत नसलेल्या बाल मित्र मंडळाच्या गणेश उपाध्याय याने या स्पर्धेतील त्याच्यापेक्षा सरस असलेल्या खेळाडूंवर मात करीत या स्पर्धेच्या जेतेपदावर अगदी रूबाबात मोहोर उमटवली. गटातील पाच खेळाडूंमध्ये स्थान मिळवण्याचे ध्येय असलेल्या या पठ्ठय़ाने स्पर्धा जिंकून उपस्थित क्रीडाप्रेमींच्या डोळ्यांचे पारणे फेडले.

बृहन्मुंबई शरीरसौष्ठव संघटना आणि मुंबई उपनगर शरीरसौष्ठव आणि फिटनेस संघटना यांनी संयुक्तपणे आयोजित केलेल्या या स्पर्धेला खरी ताकद लाभली ती टेक्नोक्रॅटस् कोहलौर इन्फ्रास्ट्रक्चरच्या नितीन मुनोत यांची. त्यांच्या आर्थिक सहकार्यामुळे या स्पर्धेतील विजेत्यांनी लाखाची रोख बक्षिसे देता आली. तसेच संघटनेच्या कार्यकर्त्यांनी वैयक्तिक सहकार्य करत स्पर्धेचा आर्थिक डोलारा सावरला. या स्पर्धेच्या निमित्ताने शरीरसौष्ठवाबाबत नवोदित शरीरसौष्ठवपटूंमध्ये जबरदस्त क्रेझ असल्याचे स्पर्धेच्या अभूतपूर्व गर्दीवरून दिसून आले. प्रत्येक गटात 40 पेक्षा अधिक खेळाडू असल्यामुळे गटातील अव्वल पाच खेळाडू निवडताना जजेसना फार कष्ट घ्यावे लागले.