
प्रत्येक निर्भयाला भयमुक्त करा….. न व्हावा गुन्हा पुन्हा पुन्हा….. अशा आशयाचे फलक हाती घेत तोंडाला काळ्या फिती व काळी वस्त्रे परिधान करत मालवणातील युवक-युवती, विद्यार्थ्यांनी शनिवारी मूक मोर्चा काढला. या मोर्चाद्वारे समाज व प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले. मुली-महिलांवरील अत्याचार थांबले पाहिजेत. अत्याचार पीडितांना न्याय मिळालाच पाहिजे.महिलांवर अत्याचार करणाऱ्या सर्व आरोपींना कठोर शिक्षा झालीच पाहिजे, अशी मागणी करत हैदराबादमधील डॉक्टर युवतीवर झालेल्या बलात्कार आणि हत्येचा निषेध करण्यात आला. निर्भयाला न्याय मिळालाच पाहिजे,अशी मागणी यावेळी करण्यात आली.
आजची महिला स्वयंसिध्द झाली आहे. मात्र, महिलावंर अत्याचार होत आहेत. समाजाने मनाची मानसिकता बदलायला हवी, असेही निवेदनाद्वारे सांगण्यात आले. मालवण तहसीलदार अजय पाटणे, मालवण पोलीस निरीक्षक विनीत चौधरी यांनी मोर्चाला भेट देऊन निवेदन स्वीकारले. अशा घटनापासून कोकणची भूमी सुरक्षित राहावी, कोकणात अशा घटना घडू नयेत यासाठी जनजागृती करण्याच्या हेतूने हा मार्चा काढण्यात आला. मालवण शहारतील भरड नाका ते मालवण पोलीस ठाण्यापर्यंत हा मूक मोर्चा काढण्यात आला. मोर्चातील युवक युवतींनी काळ्या रंगाचे कपडे परिधान केले होते. काहींनी काळ्या रंगाच्य पट्ट्या लावून मोर्चात सहभागी झाले.



























































