
बेनेट रिबेलो यांचा त्यांच्याच दत्तक मुलीने खून केला होता. खून केल्यानंतर या मुलीने तिच्या मित्रासोबत रिबेलो यांच्या शरिराचे तुकडे केले होते आणि ते सुटकेसमध्ये भरून फेकून दिले होते. दत्तक वडिलांनी माझ्यावर बलात्कार केला होता असं या अटक केलेल्या तरुणीने पोलिसांना चौकशी दरम्यान सांगितले होते. यामुळे पोलिसांनी मुलीचे पालकत्व स्वीकारलेल्या बेनेट रिबेलो यांच्याविरूद्ध पोक्सो कायद्या अंतर्गत बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. रिबेलो यांचा खून करणारी त्यांची दत्तक मुलगी ही अल्पवयीन असल्याचेही तपासात उघड झाले आहे. इतकेच नव्हे तर मुलीच्या अल्पवयीन प्रियकराविरोधातही बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रिबेलो यांचा खून झाल्यानंतर एका चित्रपटाला शोभेल अशा घटना समोर येत आहेत. गुन्हेगार मुलीचे वय 19 असल्याची प्राथमिक माहिती होती. परंतु आता तिचे आधार कार्ड मिळाल्याने ती अल्पवयीन असल्याचे निष्पन्न झाले आहे. पोलिसांनी मुलीच्या कुटुंबीयांच्या शोध घेतला. ते पूर्वी घाटकोपरमध्ये राहत होते. आता ते बेलापूरमध्ये स्थायिक झाल्याने त्यांना शोधताना पोलिसांच्या नाकी नऊ आले होते. पोलिसांनी कुटुंबींयांकडून मुलीचे आधार कार्ड मिळवले. तिची जन्मतारीख 21 जुलै 2002 असल्याचे नमूद केले आहे. 2019 च्या जुलै महिन्यात तिला 17 वर्षे पूर्ण झाली आहेत. म्हणून पोलिसांनी तिची रवानगी बालसुधारगृहात केली आहे. तसेच तिच्या अल्पवयीन प्रियकरालाही बलात्काराच्या आरोपाखाली बालसुधारगृहात पाठवण्यात आले आहे.
दोघांनी रिबेलोचा खून केला आणि त्याचे अवयव सुटकेसमध्ये टाकून वेगवेगळ्या ठिकाणी टाकले होते. एका रिक्षातून त्यांनी या सुटकेस नेल्या होत्या. त्या रिक्षावाल्याचा शोध पोलीस घेत आहेत. त्यांची साक्ष या प्रकरणासाठी महत्त्वाची असल्याचे पोलिसांनी सांगितले.





















































