
मुंबईतील अत्यंत प्रतिष्ठीत आंतरराष्ट्रीय बोर्डाच्या शाळेतील विद्यार्थ्यांचे व्हॉटसअॅप चॅट पालकांच्या निदर्शनास आले आहेत. समाजामध्ये प्रतिष्ठा असलेल्या या पालकांनी जेव्हा हे चॅट पाहिले तेव्हा ते नखशिखांत हादरले. या व्हॉटसअॅपमध्ये पालकांना सामूहीक बलात्कार आणि विद्यार्थिनींसोबत सामूहीक संभोगाच्या स्वप्नरंजनाच्या चर्चा झडताना वाचायला मिळाल्या.
हे चॅट वाचणाऱ्या पालकांनी ही बाब शाळा प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली. या प्रकाराची गंभीर दखल घेत प्रशासनाने 8 विद्यार्थ्यांना निलंबित केलं आहे. हे सगळे विद्यार्थी 13 ते 14 वर्ष वयोगटातील आहे. या चॅटमध्ये विद्यार्थ्यांनी ‘ गँगबँग’ , ‘ त्या हरामी विद्यार्थिनीला उध्वस्त करेन’ अशी भाषा वापरली आहे.
या चॅटींगमध्ये भाग घेणाऱ्या विद्यार्थ्यांपैकी काही विद्यार्थी हे शाळेमध्ये प्रमुखपदी म्हणजेच मॉनिटर किंवा तत्सम पदावर असल्याचं सांगितलं जात आहे. या सगळ्या प्रकारामुळे बऱ्याच विद्यार्थिनी घाबरल्या असून त्यांनी शाळेमध्ये जाण्यास नकार द्यायला सुरुवात केली आहे.
मुंबई मिरर नावाच्या वर्तमानपत्राने या संदर्भातील बातमी प्रसिद्ध केली असून या बातमीमध्ये म्हटलं आहे की त्यांच्या हाती 8 ते 30 नोव्हेंबरदरम्यान या विद्यार्थ्यांमध्ये झालेलं व्हॉटसअॅप चॅट हाती लागलं आहे. यामध्ये 23 नोव्हेंबर रोजीचं चॅटींग आणखीनच धक्कादायक आहे. यामध्ये विद्यार्थी ‘ काही विद्यार्थिनींपैकी एक विद्यार्थिनी मला एका रात्रीसाठी मिळायला हवी’ अशी चर्चा करत होते. नंतर या सगळ्या विद्यार्थ्यांनी फक्त दोन विद्यार्थिनींबाबतच चर्चा करायला सुरुवात केली. या चॅटींगमध्ये एका विद्यार्थ्याने ‘मी तिचं अस्तित्वच नष्ट करायला पाहीजे’ असं विधान केलं आहे. या चॅटींगमध्ये विद्यार्थ्यांनी काही विद्यार्थी आणि विद्यार्थिनींबाबत बोलताना ते समलिंगी असल्याचं म्हणत त्यांच्यावरही वाईट शब्दात शेरेबाजी केली आहे.





























































