
महिलांवरील अत्याचारांमुळे अवघ्या देशात संतापाचा डोंब उसळला असतानाच अजून एक संतापजनक घटना घडली आहे. बलात्कारापासून पळणाऱ्या अल्पवयीन दलित पीडितेवर आरोपीने पोलिसांसमोरच गोळी झाडली आहे. ही घटना बिहारमध्ये रोहतास जिल्ह्यात घडली.
नवभारत टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, रविवारी या मुलीवर चार जणांनी बलात्काराचा प्रयत्न केला होता. त्या प्रसंगातून स्वतःची सुटका करून घेत तिने पोलिसात तक्रार केली होती. त्यानुसार तिला पोलीस संरक्षणही देण्यात आलं होतं. मात्र, पोलीस संरक्षणात असतानाच आरोपींपैकी एकाने तिच्यावर गोळी झाडली आणि तिथून फरार झाला. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या मुलीला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तिची प्रकृती स्थिर असून तिच्या जिवाला कोणताही धोका नसल्याची माहिती मिळत आहे.
या घटनेनंतर गावात तणावाचं वातावरण होतं. एका आरोपीच्या घराला संतप्त ग्रामस्थांनी आग लावली तर उर्वरित आरोपींच्या घरासमोर निदर्शनं करण्यात आली. सुदैवाने पोलिसांनी वेळीच परिस्थिती नियंत्रणात आणली. या चारही जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून चारही आरोपींना अटक करण्यात आली आहे.

























































