
अंदमान येथील सावरकर बंधू स्मृती महाराष्ट्र मंडळ आजही उपेक्षितच असल्याची बाब उघड झाली आहे. केंद्रातील भाजप सरकारने स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या नावाचा वापर फक्त राजकीय स्वार्थासाठी केल्याचा आरोप मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे.
मनोहर जोशी यांनी ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निर्देशानंतर सावरकर बंधू स्मृती पोर्ट ब्लेअर अंदमानच्या बांधकामासाठी 5 लाखांचा धनादेश दिला होता. सावरकर बंधू स्मृती भवनाचे जनक गोविंदराव हर्षे यांनीही यासाठी प्रयत्न केले होते. काही वर्षांपूर्वी भूकंप आणि प्रलयामुळे भवनाचे नुकसान झाले. त्यावेळी महाराष्ट्र मंडळातर्फे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे 2 कोटींची मदत मागितली होती परंतु त्यांनी ती मदत दिली नाही. दिवंगत पांडुरंग फुंडकर यांच्या लेखी पत्राला आणि विधान परिषदेतील सूचनेलाही त्यांनी वाटाण्याच्या अक्षता लावल्या असा आरोप महाराष्ट्र मंडळाचे सल्लागार विष्णू गवळी यांनी केला आहे.
- अंदमान येथे स्वातंत्र्यवीर सावरकरांना समर्पित विश्व मराठी साहित्य संमेलन भरले होते. त्या संमेलनाला उपस्थित राहिलेले विद्यमान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र मंडळ सावरकर बंधू स्मृतीस भेट देऊन सहकार्याचे आश्वासन दिले होते. तसेच शरद पवार यांनीही ते देशाचे संरक्षणमंत्री असताना सावरकर बंधू स्मृती महाराष्ट्र मंडळाला भेट दिली होती, असेही गवळी यांनी म्हटले आहे.
सावरकरांना ‘भारतरत्न’ कधी देणार ते बोला!
सावरकरांना ‘भारतरत्न’ देण्याची मागणी शिवसेना व सर्व सावरकरप्रेमी 25 वर्षांपासून करीत आहेत. केंद्रात मागील पाच वर्षांपासून भाजपचेच सरकार आहे, मग या मागणीला भाजपने प्रतिसाद का दिला नाही? घाणेरडे राजकारण थांबवा आणि सावरकरांना ‘भारतरत्न’ कधी देणार ते बोला असे खडे बोल गवळी यांनी भाजपला सुनावले. इंदिरा गांधी पंतप्रधान असताना त्यांनी 1970 साली सावरकरांच्या नावे टपाल तिकिटाचे अनावरण केले होते अशी आठवणही त्यांनी करून दिली आहे.
























































