आगडोंब नागरिकत्व कायद्यावरून अवघा देश पेटला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नागरिकत्व सुधारित कायद्याविरोधात ईशान्यकडील राज्यांमध्ये सुरू झालेल्या आंदोलनाचे लोण आता अवघ्या देशात पसरले आहे. गुरुवारी किमान बारा राज्यांमधील जनता रस्त्यावर उतरली. उत्तर प्रदेशात लखनौमध्ये तर अक्षरशः आगडोंब उसळला असून, दोन पोलीस चौक्यांसह अनेक वाहनांना आगी लावल्या. तुफान दगडफेक करण्यात आली. पोलीस गोळीबारात लखनौत एक तर कर्नाटकात मंगळुरू येथे दोनजण ठार झाले आहेत. राजधानी दिल्लीत जमावबंदी आदेश मोडून हजारो नागरिकांनी आंदोलन केले. 19 मेट्रो स्टेशन्स बंद केली. 21 विमानांचे उड्डाण रद्द करण्यात आले. बिहारमध्ये पाटणासह अनेक ठिकाणी बंद पुकारला होता. गुजरातमध्ये पोलिसांनी आंदोलकांवर लाठीमार केला. महाराष्ट्रात मुंबई, पुणे, संभाजीनगर, मालेगाव येथे आंदोलन करण्यात आले.

उत्तर प्रदेश

लखनौमध्ये सहा ठिकाणी हिंसक घटना. दोन पोलीस चौक्या जाळल्या. संभलमध्येही आंदोलनकर्त्यांनी बस पेटवली. लखनौमध्ये आंदोलनकर्ते आणि पोलिसांमध्ये गोळीबाराची घटनाही घडली. ठाकूरगंज, हजरतगंजमध्येही हिंसक आंदोलन झाले. परिणामी 22 मेट्रो स्टेशन्स बंद ठेवावी लागली. सर्व जिल्हय़ांमध्ये जमावबंदी आदेश लागू करण्यात आला असून 65 जणांना अटक केली आहे. माकप कार्यकर्त्यांनी पाटणा, दरभंगा आणि खगडिया येथे आंदोलनकर्त्यांनी रेलरोको केला.

दिल्ली

लाल किल्ला परिसरात आज जमावबंदी आदेश जारी करण्यात आला होता, मात्र विद्यार्थ्यांनी हा आदेश मोडला आणि जोरदार आंदोलन केले. जेएनयूचा माजी विद्यार्थी नेता उमर खलिद याच्यासह योगेंद्र यादव, संदीप दीक्षित, प्रशांत भूषण यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. दुसरीकडे इंडिया गेटपासून मुख्य पोस्ट कार्यालयापर्यंत पोलिसांनी ठिकठिकाणी अडथळे उभारल्याने गुडगाव ते दिल्ली या महामार्गावर तब्बल 10 किलोमीटरचा ट्रफिक जाम झाला. हजारो गाडय़ा या जाममध्ये फसल्या. विमानतळावर गोंधळ उडाला. 16 विमानांना उशीर झाला तर 21 विमाने रद्द झाली. संपूर्ण दिल्लीत इंटरनेट आणि कॉलिंग-एसएमएस सेवा बंद करण्यात आली होती.

गृह मंत्रालयाची बैठक अचानक रद्द

केंद्रीय गृह मंत्री अमित शहा यांनी शुक्रवारी उच्चस्तरीय बैठक बोलावली होती. मात्र ही नियोजित बैठक रद्द करण्यात आल्याचे गृह मंत्रालयाने गुरुवारी सायंकाळी जाहीर केले. बैठक अचानक रद्द का केली, याचे कारण मात्र स्पष्ट करण्यात आलेले नाही.

आम्ही बदला घेऊ; हिंसाचार करणाऱयांची संपत्ती जप्त करू

लखनौसह अनेक ठिकाणी उत्तर प्रदेशात आगडोंब उसळल्यामुळे कायदा-सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. यावर संताप व्यक्त करताना मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी बदला घेण्याची धमकीच आंदोलकांना दिली आहे. हिंसाचार करणाऱयांची ओळख सीसीटीव्ही आणि व्हिडीओ शूटिंगमध्ये पटली आहे. हिंसाचार करणाऱयांचा बदला घेतला जाईल. हिंसाचार करणाऱयांची मालमत्ता जप्त करून त्याचा लिलाव करू. त्यातून मिळणारी रक्कम भरपाई म्हणून ज्याचे नुकसान झाले त्यांना दिली जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.