
>> मिलिंद शिंदे
चंद्रकांत कणसे. आजचा नव्या दमाचा दिग्दर्शक. गिरणगाव संस्कृतीच्या संस्कारात वाढलेला. वडिलांनी शिक्षणाचा हात कधी सुटू दिला नाही आणि गिरणगावाने कलेचा.
“वडिलांना तेव्हा दहा हजार पगार होता… फार बरं चाललं नव्हतं, पण फार वाईटही परिस्थिती नव्हती.’’ मुंबईच्या हृदयात असलेल्या लालबागला एक सिगारेट कंपनी होती. अतिशय नामांकित ती कंपनी आजही हयात आहे. वारेमाप नफा कमवतेय, पण लालबागमधली बंद पडली. अनेक कामगारांच्या-कर्मचाऱ्यांच्या स्वप्नांचा धूर झाला. बरेचजण खचून गेले. कित्येक वर्षांच्या सेवेला खीळ बसली. वाटा दिसेनाशा झाल्या… कुशल-अर्धकुशल सगळेच भांबावून गेले. यात एक पिता होता ते चंद्रकांत कणसे या आजच्या नव्या दमाच्या सिनेदिग्दर्शकाचे वडील… विष्णू कणसे. सोबतीला त्यांची पत्नी संजना विष्णू कणसे… अनेक वर्षांच्या नोकरीचा असलेला आधाराचा तंबू कोसळला. पण विष्णू कणसे आपल्या शिक्षणाला धरून उभे राहिले. त्यांनी खाजगी शिकवण्या सुरू केल्या आणि उदरनिर्वाहाचं साधन निर्माण केलं. शिक्षण पाठिशी असल्याचा फायदा झाला… कुटुंबांची घडी बसू लागली… त्या घरात वाढत होता… चंद्रकांत कणसे…
नोकऱया गेलेल्या कामगारांची काय अवस्था झाली होती हे आपण अनेक नाटकंमधून, सिनेमा, कादंबऱयांमधून पाहिलंय, पण केवळ आईवडिलांच्या संस्कारामुळे योग्य वाटेवर राहिला तो चंद्रकांत कणसे. वडिलांसोबत शिकवणी द्यायला लागला. घर चालू लागलं. जीव धरू लागलं. सोबत महाविद्यालयीन शिक्षण चालू होतंच. ‘‘मला खो-खोची फार आवड… खो-खो खेळावं, त्यात पुढे काहीतरी करावं असं फार वाटायचं.. पण ते सगळं या धुरात कुठं दिसेनासं झालं ते समजलंच नाही. कॉलेज चालू होतंच… आणि गाठ पडली कमलेश सावंत या हरहुन्नरीशी.
आजचा आघाडीचा नट… आणि एकांकिकांशी नातं जोडलं गेलं… आणि आपण आता अभिनेता व्हायचंच असं मनोमन वाटू लागलं… वाटचाल सुरू झाली… आपण ठरवतो आणि सगळं ताब्यात येतं असं असतं तर किती बरं झालं असतं… पण प्रयत्न सुरू होते… छापील काही सादर करण्यापेक्षा आपण आपलं काही तरी नवीन करू. त्यातून या दोघांमध्ये आणखी एक मित्र सामिल झाला. आजचा नावाजलेला लेखक आशीष पाथरे. ‘आशीष पाथरेला मी लेखक केलंय…’ असं हे सगळे मित्र आपापसात गमतीनं बोलत असतात…
‘गांधी अनकॉमन मॅन’ या एकांकिकेत अख्ख्या चमूला एकत्र जोडलं. लेखक अर्थातच आशीष पाथरे. सुदैवानं या एकांकिकेला त्यावेळच्या प्रसिद्ध अल्फा करंडक स्पर्धेत पारितोषिक मिळालं. चंद्रकांतचा आत्मविश्वास दुणावला आणि त्यानंच बसवलेली ‘रोज मरे’ ही एकांकिका आयएनटीला दुसरी बसली. सगळीकडं कौतुक झालं. चंद्रकांत कणसेला लोक ओळखायला लागले. उर भरून येऊ लागला… आणि आपल्याला हे जमतंय… आपण दिग्दर्शक व्हायचं हे ठरलं.
‘एक दिवस तू माझी बायको होणार…’, ‘आपलं लग्न होणार दोनशे टक्के’, ‘आपण संसार थाटणार तुझ्यासोबत’, ‘तू आपल्याला आवडतेस’, असं गमतीत एका मुलीला बोलताना तिनं तिच्या घरी सांगितलं की, मला चंद्रकांत कणसेशी लग्न करायचंय… तिकडून होकारही आला आणि गम्मत करणाऱया चंद्रकांतला भान आलं. खरं तर त्याला रेणुका आवडत होती, पण रेणुका ताबडतोब ते तडीस नेऊन आपल्याला अचानक अशा परीक्षेला उभं करील हे ध्यानीही नव्हतं.
‘‘मी घरी सांगितलंय त्यांचा होकार आहे.’’
या रेणुकाच्या वाक्यावर शांतता आणि अंधार दोन्ही दाटू लागला… आणि मग तहाच्या गोष्टी सुरू झाल्या… आणि खरं खरं सांगावं इथपर्यंत आल्या…
‘‘माझी दहा बाय दहाची खोली आहे चाळीत.’’ परिस्थिती फार बरी नाही इ.इ. सांगितलं. हरेल ती रेणुका कसली. ती ठाम होती. आणि तिनं दहा बाद दहाच्या खोलीत चंद्रकांतच्या आईवडिलांसोबत संसार खुलवला. घरत नवीन माणूस आलं. परकं होतं ते नवीन घरात विरघळून गेलं, नवी कळा आली…
तोवर चंद्रकांत त्याचे गुरू राजेश देशपांडे यांच्यापर्यंत पोहोचला होता ती मालिका होती ‘गंगुबाई नॉन मॅट्रिक’. शेवटचे काही भाग स्वतः चंद्रकांतच्या हवाली केले. करण्यासाठी राजेशनं मोठा विश्वास दाखवला. चंद्रकांतनं ऊर भरून श्वास घेतला. त्यातच राजेश त्याचा सिनेमा ‘धुडगुस’मध्ये व्यस्त झाला आणि गंगुबाईची जबाबदारी पूर्णतः चंद्रकांतवर पडली आणि मग ‘धुडगुस’ सुरू झाला. चंद्रकांतची निष्ठा, सचोटी, जिद्द पाहून संजय जाधवांना तो आवडला आणि त्यांच्या चमूत दाखल करून घेतला गेला.
‘दुनियादारी’ एक मोठं पान मराठी सिनेमातलं. तिथं चंद्रकांत संजय जाधव यांना सहाय्यक म्हणून काम करीत होता…
अंकुश चौधरीनं हे सगळं हेरलं होतं आणि ‘दगडी चाळ’ हा अतिशय गाजलेला सिनेमा चंद्रकांत याला बहाल केला. झालाही आणि चंद्रकांत कणसेचं नाव झालं. ‘दगडी चाळ’ या अतिशय गाजलेल्या सिनेमाच्या श्रेयनामावलीत दिग्दर्शक ‘चंद्रकांत कणसे’ हे नाव कोरलं गेलं आणि लालबागचा छोकरा महाराष्ट्राचा झाला.
रेणुका जेव्हा आली तेव्हा काम मिळणं थोडं बंद झालं होतं आणि मनात नाना शंका येऊ लागल्या होत्या… पण मी आज जो काही झगडतोय, काम करतोय यामागे फक्त आणि फक्त माझी धीराची पत्नी रेणुकाच आहे, असं तो सांगतो. रेणुका सेंचुरी रेयॉनमध्ये कार्यरत आहेत.
दहा बाय दहाचं माझं घरं आहे, तुला जमेल का… असं चंद्रकांतनं रेणुकाला सांगितलं होतं. कारण त्या याहून बऱया घरच्या होत्या. रेणुकानं धाडस केलं आणि कणसेच्या घराण्यात स्वतःला सामील केलं. चंद्रकांत आता तुझा ‘दगडी चाळ – टू’ येतोय. तुला शुभेच्छा आहेतच, पण आता दहा बाय दहाची खोली सुटणार आहे आणि मुंबईच्या एक पॉश भागात कणसेचं टू-थ्री-फोर-फाईव्ह बीचके घर होईल. सिगारेट कंपनीनं कित्येकांच्या घराचा धूर केला, पण त्यातल्या कित्येकांसाठी तू जगण्याची ठिणगी आहेस…
























































