
नागरिकत्व सुधारित कायद्याच्या विरोधात देश अक्षरशः जळतो आहे. उत्तरपासून दक्षिण हिंदुस्थानपर्यंत हजारो लोक रस्त्यावर उतरून आंदोलने करीत आहेत. शुक्रवारी उत्तर प्रदेशात पोलीस गोळीबारात किमान 6 जणांचा मृत्यू झाला असून 50 पोलीस जखमी झाले आहेत. सर्वत्र तणाव आहे. अनेक जिल्हय़ांमधील मोबाईल, इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. राजधानी दिल्लीतही जामा मशीदबाहेर प्रचंड आंदोलन करण्यात आले. गाडय़ांची जाळपोळही झाली. गुजरातमध्ये आंदोलनावेळी हिंसाचार भडकला. दरम्यान, अवघा देश असा आंदोलनात जळत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मात्र देशहितासाठी निर्णय घेताना खूप काही सहन करावे लागते. अनेक आरोप होतात पण देशहितासाठी सहन करावे लागते असे वक्तव्य केले आहे.
नागरिकत्व सुधारणा कायद्याला उत्तर प्रदेशात प्रचंड विरोध होत असून 20 जिल्हय़ांमध्ये हिंसाचार पसरला आहे. लखनौमध्ये गुरुवारी पोलीस गोळीबारात एकजण ठार झाला होता. शुक्रवारी सहाजणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी आहेत. मात्र उत्तर प्रदेशचे पोलीस महासंचालक ओ. पी. सिंग यांनी शुक्रवारी पाचजण ठार झाल्याचे सांगितले. यामध्ये बिजनौरमध्ये 2 आणि मेरठ, फिरोजाबाद व संबालमध्ये प्रत्येकी एकजण ठार झाला. दगडफेकीत 50 पोलीस गंभीर जखमी झाले आहेत.
अहमदाबादेतील ‘सात हिंदुस्थानी’
गुजरातमध्येही आंदोलनाला हिंसक वळण लागले. अहमदाबादेत अनेक ठिकाणी पोलीस आणि नागरिकांमध्ये वादावादी झाली. शाह-ए-आलम परिसरात मोठा हिंसाचार भडकला. दगडफेकीत एसीपी, डीवायएसपीसह 19 पोलीस जखमी झाले. विशेष म्हणजे यावेळी आंदोलन करणारे सात तरुण ‘ढाल’ बनून पुढे आले. तरुणांच्या हातात तिरंगा होता. त्यांनी पोलिसांवरील दगडफेक रोखली. ‘ सात हिंदुस्थानी’ म्हणून व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या तरुणांचे सर्वत्र कौतुक होत आहे. वडोदरा येथेही दगडफेक झाली. पोलिसांनी 3 जणांना ताब्यात घेतले. गुजरातमध्ये तणाव वाढला आहे.
पंतप्रधान काय म्हणाले?
देशाला संकटातून बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. अर्थात हे सोपे नाही. देशहितासाठी निर्णय घेताना लोकांचा राग सहन करावा लागतो. लोकांची नाराजी सहन करावी लागते. या व्यतिरिक्त अनेक आरोप होतात. पण देशहितासाठी सहन करावे लागते, असे वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘असोचेम’च्या वार्षिक सर्वसाधारण सभेत केले. नागरिकत्व कायद्यावरून देशात सुरू असलेल्या हिंसाचाराचा त्यांनी उल्लेख केला नाही, मात्र पंतप्रधानांनी अप्रत्यक्ष मत मांडले. यावेळी पंतप्रधानांनी जीएसटी, उद्योग व्यवस्था यावर आपली भूमिका स्पष्टपणे मांडली.
9 राज्यांतील 34 जिल्हय़ांमध्ये आंदोलन
उत्तर प्रदेश ः गाजियाबाद, मेरठ, सुलतानपूर, गोरखपूर, कानपूर, उन्नाव, बुलंद शहर, हाथरस, हापुड, अमरोहा, मुजफ्फरपूर, सीतापूर, बिजनौर, मुरादाबाद, फिरोजाबाद, भदोही, वाराणसी, बहराइच
- मध्य प्रदेश – जबलपूर
- गुजरात – अहमदाबाद, बनासकांठा, वडोदरा
- कर्नाटक – मंगळुरू, दक्षिण कन्नड, बंगळुरू
- राजस्थान – जोधपूर
- केरळ – वायनाड, कोझिकोडे, कासरकोड, कन्नूर
- पश्चिम बंगाल – कोलकाता
- तामीळनाडू – चेन्नई
- दिल्ली – शहरात ठिकठिकाणी























































