
पूरग्रस्तांना अपेक्षित मदत मिळाली पाहिजे, तसेच विविध फायनान्स कंपन्यांकडून महिलांनी उद्योगासाठी घेतलेली कर्ज माफ करा यांसह अन्य मागण्यांसाठी शुक्रवारी सांगली फाटा येथे पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरच पूरग्रस्त महिलांनी चक्क चूल मांडून लक्ष वेधले. छत्रपती शासन संघटनेच्या वतीने अचानक हे आंदोलन करण्यात आल्याने पोलिसांची तारांबळ उडाली. यामुळे वाहतुकीची प्रचंड कोंडी झाली होती.
महापूर आणि अतिवृष्टीमुळे जिह्याची मोठय़ा प्रमाणात हानी झाली. अजूनही शासनाकडून पूरग्रस्तांना नुकसानभरपाई देण्याचे काम सुरूच आहे. अद्यापि अनेक पूरग्रस्तांना शासनाकडून आलेली नुकसानभरपाई मिळण्यास विलंब होत आहे. त्यामुळे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी, तसेच प्रशासनाला जाग आणण्यासाठी शुक्रवारी दुपारी छत्रपती शासन संघटनेच्या वतीने महिलांकडून पुणे -बंगळुरू महामार्ग अडविण्यात आला. अचानक हे आंदोलन करण्यात आल्याने वाहतुकीची प्रचंड कोंडी झाली.
आंदोलक महिलांनी चक्क महामार्गावरच चूल मांडून सुमारे वीस ते पंचवीस मिनिटे महामार्ग रोखून धरला होता. पूरग्रस्तांना अपेक्षित मदत मिळाली पाहिजे, तसेच महिलांनी उद्योगासाठी घेतलेले कर्ज माफ करा आदी प्रमुख मागण्या यावेळी करण्यात आल्या. महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. अखेर पोलिसांनी आंदोलक महिलांना ताब्यात घेऊन नंतर सोडून देण्यात आले.



























































