बँक KYC मध्ये यापुढे करावा लागणार धर्माचा उल्लेख

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बँकेत खातेधारकाच्या नावे होऊ शकणारे गैरव्यवहार रोखण्यासाठी काही वर्षांपूर्वी बँकांमध्ये KYC (know your customer) ही व्यवस्था सुरू करण्यात आली. त्यात खातेधारकाला आपल्या ओळखीसाठीची कागदपत्रे जमा करून बँकेचा केवायसी अर्ज भरून देणं बंधनकारक आहे. पण, या अर्जात आता धर्माचाही उल्लेख खातेधारकाला करावा लागू शकतो.

नवभारत टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, फॉरेन एक्सचेंज मॅनेजमेंट अॅक्ट अर्थात FEMAने काही नियम बदलल्यामुळे केवायसीमध्ये धर्माचा कॉलम येण्याची शक्यता आहे. याचं कारण, फेमाच्या नवीन नियमांनुसार मुस्लीम धर्मीयांखेरीज काही निवडक अल्पसंख्याकांना एनआरओ म्हणजेच अनिवासी साधारण बचत खाते उघडण्याची सुविधा देण्यात आली आहे. ज्यात ते हिंदुस्थानात कमावलेली रक्कम जमा करू शकतात. त्यासाठी त्यांच्या धर्माचा उल्लेख आवश्यक असल्याने केवायसीच्या नियमातही बदल करण्यात आले आहेत.

रिझर्व्ह बँकेने 2018 मध्ये जारी केलेल्या फेमा नियमांनुसार, पाकिस्तान, बांगलादेश, अफगाणिस्तानहून आलेल्या हिंदू, शीख, बौद्ध, जैन, पारसी आणि ख्रिश्चन अशा आणि दीर्घ मुदतीचा व्हिसा असलेल्या अल्पसंख्याक लोकांनाच एनआरओविषयीचे अधिकार दिले गेले आहेत. ज्यांच्याकडे दीर्घ मुदतीचा व्हिसा असेल ते हिंदुस्थानात संपत्तीची खरेदी करू शकतात आणि बँकेत खातीही उघडू शकतात. मात्र, त्यांना एकावेळी एकच खाते उघडता येईल आणि जेव्हा त्यांना इथलं नागरिकत्व मिळेल तेव्हाच त्यांचं खातं इथल्या सर्वसामान्य बचत खात्यात परिवर्तित करण्यात येईल. या नियमांत फक्त नास्तिक, मुस्लीम प्रवासी, म्यानमार, श्रीलंका आणि तिबेट इथल्या लोकांचा समावेश केलेला नाही.