#CAA आंदोलनासाठी विद्यार्थ्यांची आयडियाची कल्पना! नेटकऱ्यांनी केलं कौतुक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नागरिकत्व संशोधन कायद्याला देशभरातून विरोध होताना दिसत आहे. दिल्ली, मुंबई, बेंगळुरू अशा देशातील महत्त्वाच्या शहरांमध्ये आंदोलने होत आहेत. अनेक भागांत आंदोलनाला हिंसक वळण लागलं आहे. अशा परिस्थितीत बेंगळुरू येथील विद्यार्थ्यांनी भन्नाट कल्पना लढवून आपलं आंदोलन शांततेत पार पाडलं आहे. नेटकऱ्यांनीही त्यांच्या या कल्पनेला दाद दिली आहे.

CAA विरोधात देशभरात उसळलेल्या हिंसक आंदोलनाला रोखण्यासाठी विविध ठिकाणी जमावबंदीचे आदेश देण्यात आले होते. 19 डिसेंबर रोजीही बेंगळुरू पोलिसांनी कलम 144 लागू करत जमावबंदी केली होती. इंडियन इन्स्टिट्युट ऑफ मॅनेजमेंटच्या बेंगळुरू इथल्या शाखेतील विद्यार्थ्यांनी एक भन्नाट कल्पना वापरत आपला निषेध तर नोंदवलाच पण कायदा आणि सुव्यवस्थाही राखली.

आयआयएमबीच्या विद्यार्थ्यांना संस्थेच्या गेटबाहेर आल्यास अटक करण्याचा इशारा देण्यात आला होता. त्यामुळे विद्यार्थ्यांनी त्यांच्या चपला बूट काढले आणि गेटबाहेर शिस्तबद्ध पद्धतीने ठेवले. आपल्या निषेधाचे फलकही त्यांनी गेटवर ठेवले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी गेट बंद केलं आणि संस्थेच्या आतल्या भागात गेटसमोरच आंदोलन करत बसून राहिले. अतिशय शांततेने केलेल्या या कृतीमुळे पोलिसांवरील ताण कमी झाला.

या आंदोलनाचे फोटो व्हायरल झाले असून नेटकरी या विद्यार्थ्यांच्या हुशारीला दाद देत आहेत. अतिशय प्रगल्भतेने त्यांनी या आंदोलनात सहभाग नोंदवल्याबद्दल नेटकरी त्यांचं कौतुक करताना दिसत आहेत. या आंदोलनाचा व्हिडीओही व्हायरल झाला आहे.