
गुहागर चिपळूण मार्गावरील रामपूर घाटातील रस्त्याकडेला बेसुमार गवत आणि वृक्षाची वाढ झाली आहे. त्यामुळे वाहन चालवताना खूप अडचणी येत आहेत. तरी रस्त्याकडील ही झाडी तोडण्याची मागणी वाहनचालकांकडून होत आहे.
गुहागर चिपळूण मार्ग हा 46 किलोमीटरचा असून गुहागरकडे येणारा ह एकमेव महामार्ग आहे. या रस्त्यावरून दिवसभरात अनेक वाहने ये – जा करत असतात. मात्र गेली दोन वर्ष हा रस्ता रुंदीकरण करण्यासाठी हस्तांतरित करण्यात आल्याने या रस्त्याची डागडुजी कोणी करायची असा प्रश्न सध्या उपस्थित झाला आहे. या रस्त्याच्या कडेला अनेक ठिकाणी झाडी झुडपे वाढलेली दिसतात. तर अनेक ठिकाणी मोठ मोठे खड्डे पडलेले आहेत. याच रस्त्याला रामपूर घाट हा महत्त्वपूर्ण घाट असून या घाटात अनेक वळणांवर मोठी झुडपे आणि झाडे वाढल्याने समोरील वाहन दिसत नाही. परिणामी अपघात होण्याची दाट शक्यता दिसत आहे. तरी संबंधित कंत्राटदार किंवा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या आधिकाऱ्यांनी याकडे त्वरीत लक्ष देऊन या रस्त्यावरल झाडी तोडावी अशी मागणी नागरिकांसह वाहनचालकांमधून केली जात आहे.
हा रस्ता गुहागर विजापूर महामार्ग म्हणून नावरुपास असून सध्या या रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम सुरू आहे. हा रस्ता मनिषा कन्स्ट्रक्शन हे रुंदीकरणाचे काम करीत असून त्यांनी सद्या याच रस्त्यावरील देवघर ते चिखलीच्या दरम्याने मोऱ्या टाकण्याचे काम सुरू केले आहे. याठिकाणी मात्र त्यांनी रस्त्याच्या कडेतील झाडे आणि झुडपे तोडून रस्ता सपाट केला आहे. अशाच प्रकारे सर्व रस्त्यावरील वाढलेली झाडी झुडपे तोडावीत अशी मागणी होत आहे.



























































