अलिबाग जिल्हा परिषदेसमोर प्राथमिक शिक्षकांचे एक दिवसाचे धरणे आंदोलन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जुनी पेन्शन योजना, मृत डिसीपीएस धारकांच्या कुटूंबाना दहा लाखाची मदत मिळावी आणि इतर विविध प्रलंबित मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभागाच्या शिक्षकांनी शनिवारी जिल्हा परिषदेसमोर एक दिवसाचे धरणे आंदोलन केले. महाराष्ट्रात सर्व जिल्हा परिषद कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी जुनी पेन्शन योजना लागू करा अशा घोषणा शिक्षकांनी देत परिसर दणाणून सोडला. आपल्या मागण्यांचे निवेदन शिष्टमंडळाने मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप हळदे यांना दिले. शासनाने प्रलंबित मागण्यांकडे लक्ष द्यावे, अशी मागणी यानिमित्ताने राज्याध्यक्ष राजेश सुर्वे यांनी केली आहे.

रायगड जिल्हा परिषदेसमोर जिल्ह्यातील शिक्षकांनी शनिवारी एक दिवसाचे धरणे आंदोलन केले. राज्य अध्यक्ष राजेश सुर्वे, जिल्हाध्यक्ष संजय निजापकर, जिल्हा कार्याध्यक्ष उदय गायकवाड, जिल्हा कार्यवाह विजय पवार, वैभव पिंगळे, जिल्ह्यातील शिक्षक आंदोलनात सहभागी झाले होते. शासनाने कॅशलेस मागणी मान्य केल्याबद्दल शिक्षक संघटनेतर्फे मुख्यमंत्री, मंत्री यांचे आभार व्यक्त केले आहेत.

रायगड जिल्हा परिषदेसमोर जिल्ह्यातील शिक्षकांनी आपल्या प्रलंबित मागण्यासाठी शनिवारी राज्यव्यापी धरणे आंदोलन केले. जुनी पेन्शन योजना लागू करणे, डीसिपीसी धारकांना सातव्या वेतनाची थकीत रक्कम अदा करणे, मृत डिसीपीएस धारकांच्या कुटूंबाना दहा लाख मदत जाहीर करणे, प्रलंबित निवड श्रेणीचे व वरिष्ठ वेतन श्रेणीचे प्रस्ताव निकाली काढावेत, निवड श्रेणीसाठी एकच निकष करावे, रिक्त पदे त्वरित भरावी, शिक्षकांना मेडिक्लेम योजना लागू करावी, बिंदूनामावली तातडीने पूर्ण करावी, 15 वित्त आयोगाच्या निधीतून जिल्हा परिषद शाळांना आर्थिक मदत आणि वीज बिल देयके करावी, बी.एल. ओ. काम रद्द करावे अशा मागण्यांचे निवेदन शिष्टमंडळाने मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप हळदे याना दिले.