समित द्रविडचे धडाकेबाज द्विशतक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

द वॉल राहुल द्रविड याचा 14 वर्षीय मुलगा समित त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवताना दिसत आहे. कर्नाटक राज्य आंतरविभागीय स्पर्धेतील लढतीत त्याने उपाध्यक्ष इलेव्हन संघासाठी खेळताना पहिल्या डावात 201 धावांची धडाकेबाज खेळी साकारली. दुसऱया डावातही त्याने नाबाद 94 धावांची खेळी साकारतानाच धारवाड विभागाचे तीन फलंदाजही बाद केले. ही लढत अनिर्णित राहिली.

समित द्रविडने पहिल्या डावात 256 चेंडूंचा सामना करताना 201 धावांची फटकेबाजी केली. या खेळीत त्याने 22 चौकारांची आतषबाजी केली. समित द्रविड याने शालेय स्तरावर खेळताना धावांचा पाऊस पाडत साऱयांच्या नजरा आपल्याकडे वळवल्या आहेत.

गेल्या चार वर्षांमध्ये उल्लेखनीय कामगिरी

समित द्रविडने 2015 साली 12 वर्षांखालील क्रिकेट स्पर्धेत मल्ल्या अदिती आंतरराष्ट्रीय शाळेचे प्रतिनिधित्व करताना सलग तीन अर्धशतके झळकवली होती. या तिन्ही अर्धशतकांमुळे त्याच्या शाळेने विजय मिळवला होता. त्यानंतर 14 वर्षांखालील स्पर्धेत त्याने खणखणीत शतक झळकवत संघाला जिंकून दिले.