बिग बी राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्याला राहणार गैरहजर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

चित्रपटसृष्टीतील अमूल्य योगदानाबद्दल बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांना आज, 23 डिसेंबरला 66 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते ‘दादासाहेब फाळके पुरस्कार’ प्रदान करण्यात येणार होता. मात्र प्रकृती अस्वास्थ्यामुळे आपण या सोहळ्याला उपस्थित राहू शकत नाही, अशी खंत बिग बी यांनी ट्विटरवर व्यक्त केली आहे. त्यामुळे बिग बी यांच्या लाखो फॅन्सचा हिरमोड झाला आहे.

महानायक अमिताभ बच्चन यांनी 1969 साली ‘सात हिंदुस्थानी’ या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केले होते. गेली अनेक दशके आपल्या दमदार अभिनयाने छोटा आणि मोठा पडदा गाजवला आहे. वयाची सत्तरी ओलांडली तरीही बॉलीवूडच्या सर्वात व्यस्त कलाकारांपैकी ते आहेत. चित्रपटसृष्टीतील त्यांच्या अमूल्य योगदानाची दखल घेत सप्टेंबर महिन्यात त्यांना चित्रपटसृष्टीतील सर्वोच्च असा ‘दादासाहेब फाळके पुरस्कार’ जाहीर झाला होता. उद्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांचे वितरण दिल्लीत होणार आहे. मात्र या सोहळ्याला आपल्याला हजर राहता येणार नसल्याची खंत त्यांनी ट्विटद्वारे व्यक्त केली आहे. बिग बी म्हणाले. ‘ताप येत असल्याने प्रवास करणे शक्य नाही. दूर्दैवाने, मी दिल्लीला होणाऱया राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार वितरण सोहळ्यात सहभागी होऊ शकत नाही. याचा मला पश्चाताप होतोय’. काही दिवसांपूर्वी प्रकृतीच्या कारणात्सव बिग बी 25 व्या कोलकाता इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलला देखील गैरहजर राहिले होते.