तारकर्लीत व्हेल माशाला जाळ्यातून सोडवून दिले जीवदान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मालवणातील तारकर्ली येथील मच्छिमार समुद्रात मासेमारीसाठी गेले असता त्यांच्या जाळ्यात मोठा व्हेल मासा अडकला. माशाला किनाऱ्यावर आणून मच्छिमार ग्रामस्थांच्या मदतीने जाळ्यातून माशाची सुटका करत त्याला पुन्हा समुद्रात सोडण्यात आले. तारकर्लीत मासेमारांनी व्हेल माशाला जीवान दिले आहे. महासागरात आढळणाऱ्या ब्लू व्हेल प्रजातीतील हा मासा असल्याचे बोलले जात आहे. सुमारे 10 ते 15 फूट लांबीचा हा मासा होता.

तारकर्ली येथील राजाराम‌ उर्फ बाबु खराडे आणि लवु कुबल मासेमारी करताना त्यांच्या जाळ्यात व्हेल मासा अडकला. शेपुट जाळ्यात अडकल्याने या मोठ्या व्हेल माशाला किनाऱ्यावर आणण्यात आले. राजाराम उर्फ बाबु खराडे सागर रक्षक म्हणुन कार्यरत असल्याने त्यांनी काळजीपूर्वक या माशाला किनाऱ्यावर आणले. याबाबत ग्रामस्थांना माहिती मिळताच त्यांनी किनाऱ्यावर धाव घेतली. यावेळी विष्णु कुबल यांनी या दुर्मिळ माशाला जीवदान देण्याची कल्पना मांडली. त्यानंतर उपस्थित असलेल्या अनिल टिकम, दादा कांबळी, आबा देऊलकर, दिपक रामचंद्र कुबल, दादा खराडे, सहदेव चिंदरकर, लक्ष्मण मोंडकर व इतर ग्रामस्थांच्या मदतीने व्हेल माशाला जाळ्यातुन मोकळे करण्यात आले.

माशाची जाळ्यातून सुटका होताच रश्मिन (राजा) रोगे, हर्षद खराडे, भुषण धुरत या स्थानीक डाईव्ह मास्टर्सनी आपल्या स्कुबा कौशल्याचा मदतीने व्हेल माशाला खोल समुद्रात नेवून सोडण्यासाठी मेहनत घेतली. व्हेल माशाला जीवदान देण्यासाठी ग्रामस्थ, मच्छिमार यांनी घेतलेल्या मेहनतीबाबत प्राणी व पर्यावरण प्रेमीमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.