2019 मध्ये ‘डेटा लीक’ प्रचंड वाढले; एसबीआय, फेसबुकसहीत कोट्यवधी युजर्सचा डेटा चोरीला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ऑनलाइन शॉपिंग असो की बँकेचे व्यवहार… गेल्या काही वर्षांत ‘डेटा लीक’ होण्याचे प्रकार मोठय़ा प्रमाणावर वाढले आहेत. हॅकर्सना लोकांचा हा पर्सनल डेटा महत्त्वाचा असतो हे खरेच, पण काही वेळा संगणकांमधील त्रुटी, कमतरता किंवा सर्व्हर सुरक्षित नसल्याने हा डेटा नाहक हॅकर्सना मिळतो. 2019मधील अशाच काही प्रकारांचा हा आढावा…

स्टेट बँकेला मोठा फटका

सर्व्हर सुरक्षित ठेवला नव्हता म्हणून स्टेट बँकेतल्या तब्बल 40 कोटी खातेदारांची माहिती 2019 या वर्षात लीक झाली होती. ही घटना डिसेंबर 2018 ते जानेवारी 2019 या काळात घडली.

डार्क वेबवर विक्री

दोन-तीन महिन्यांपूर्वीच ऑक्टोबरमध्ये हिंदुस्थानी बँकांमधील 13 लाख क्रेडिट आणि डेबिट कार्ड्सची माहिती ‘डार्क वेब’वर विक्रीला ठेवण्यात आली होती. या कार्ड्सबाबतची माहिती प्रत्येक कार्डमागे 100 डॉलर्स या दराने विकली गेली.

जस्ट डायलवरही घाला

जस्ट डायल हे ऍप वापरणाऱया युजर्सचाच नव्हे, तर 2015 ते 2019 या कालावधीत कंपनीच्या हेल्पलाइन नंबर्सचा वापर करणाऱया अशा मिळून जवळपास 10 कोटी ग्राहकांचे फोन नंबर्स हॅकर्सने पळवले.

फेसबुकचाही डेटा लीक

या वर्षात फेसबुकच्या युजर्सच्या डेटालाही नुकसान पोहोचले होते. फेसबुकमध्ये काम करणाऱया हजारो कर्मचाऱयांना युजर्सचा पासवर्ड सहज पाहता येत होता. हे उघड झाल्यामुळे फेसबुकचा सर्व्हर किती कुचकामी आहे ते स्पष्ट झाले होते.

हेल्थकेअर वेबसाईट्सवर हल्ला

काही हेल्थकेअर वेबसाईट्सवर ‘फॉलन स्काय-519’ नावाच्या एका चिनी हॅकरने फेब्रुवारी 2019 मध्ये सायबर अटॅक केला होता. त्यावेळी 68 लाख ग्राहकांचा डेटा थेट सर्व्हरमधून चोरला होता.