‘पद्मदुर्गा’वर घुमला शिवरायांचा जयजयकार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुरूडच्या समुद्रातील अभेद्य जंजिरा किल्ला जिंकण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज यांनी याच किल्ल्यापासून समुद्रात काही अंतरावर उभारलेल्या किल्ले ‘पद्मदुर्गा’वर पुन्हा शिवकाळ अवतरला. स्वराज्याच्या आरमारातील मेरुमणी ठरलेला ‘पद्मदुर्गा’ ढोल-ताशांचा गजर, तुताऱयांचा निनाद, पहाडी पोवाडय़ांची ललकारी आणि छत्रपती शिवाजी महाराज की जय.. च्या जयजयकाराने दणाणून गेला. निमित्त होते ‘पद्मदुर्ग जागर’च्या 11 व्या वर्धापनदिनाचे. कोकणकडा मित्र मंडळ, पद्मदुर्ग जागर समिती आणि मुरूड नगर परिषद यांच्या विद्यमाने झालेल्या या सोहळ्यास महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून शिवप्रेमी उपस्थित होते. किल्ल्यापासून छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेची शाही मिरवणूक निघाली. दुर्गदेवी कोटेश्वरीच्या चरणी या पालखीचा समारोप झाला.

तरंगती जेट्टी आकर्षण

यंदाच्या ‘पद्मदुर्ग’ जागरमध्ये आकर्षण ठरले ती तरंगती जेट्टी. महाडचे शिवसेना आमदार भरत गोगावले, मुरूड-अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांच्या सहकार्याने व पद्मदुर्ग समितीचे प्रकाशसर पाटील, अशिल ठाकूर आणि कोळी बांधवांच्या परिश्रमामुळे ही जेट्टी उभी राहिली. त्यामुळे प्रवाशांना बोटीतून चढणे व उतरणे ओहटीमुळेही सोयीचे झाले होते.