
राज्यातील जनतेला दिलेली आश्वासने पूर्ण करण्यासाठी आक्रमक व्हा, ट्रोलर्सना उत्तरे देणे हे आपले काम नाही, असे आवाहन शिवसेना नेते, युवासेना प्रमुख-आमदार आदित्य ठाकरे यांनी शिवसैनिक आणि युवासैनिकांनी केले आहे.
नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात आंदोलन केल्याबद्दल जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठातील विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलिसी कारवाईची तुलना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जालियनवाला बाग हत्याकांडाशी केली होती. त्यावरून उद्धव ठाकरे यांच्याबद्दल फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्या वडाळा येथील हिरामण तिवारी याचे शिवसैनिकांनी भरचौकात मुंडण केले होते. त्या घटनेवरून आदित्य ठाकरे यांनी हे आवाहन केले आहे.
‘जनतेची सेवा करून अशा ट्रोलर्सना उत्तर द्या. रोजगारनिर्मिती होऊन आपली अर्थव्यवस्था बळकट कशी होईल त्या दिशेने काम करा. कायदा-सुव्यवस्था राखण्याचे काम पोलिसांचे आहे. इतर कुणीही कायदा हातात घेऊ नये,’ असे आदित्य ठाकरे यांनी शिवसैनिक आणि युवासैनिकांना सांगितले आहे.



























































