
विक्रोळी येथील शिवसेनेचे उपविभागप्रमुख चंद्रशेखर जाधव यांच्यावर झालेल्या खूनी हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. यातील एका आरोपीला पोलिसांनी मध्य प्रदेशमधून अटक केली, तर दुसऱ्या आरोपीच्या ठाण्यात मुसक्या आवळण्यात आल्या. कृष्णधर सिंह आणि आनंद फडतरे अशी आरोपींची नावे आहेत. या दोघांना न्यायालयाने 1 जानेवारी, 2020 पर्यंत पोलीस कोठडीची शिक्षा सुनावली आहे.
गेल्या आठवड्यात गुरुवारी (19 डिसेंबर) विक्रोळीतील टागोरनगरमधील साई मंदिरात दर्शनासाठी गेलेल्या शेखर जाधव यांच्यावर मंदिर परिसरात गोळीबार झाला होता. गोळीबारात त्यांच्या उजव्या हाताच्या दंडाला दुखापत झाली. खूनी हल्ल्यानंतर पळून जाणाऱ्या आरोपीला जाधव आणि मंदिर परिसरातील लोकांनी पकडले. यावेळी झालेल्या मारहाणीत आरोपीही जखमी झाला. प्रसाद पुजारी याने हा हल्ला करण्यास सांगितले होते, अशी माहिती आरोपीने दिली. दरम्यान, जाधव आणि गोळीबार करणाऱ्या आरोपीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. प्रकरणाचे गांभीर्य ओळखून गुन्हे शाखेचे सह पोलीस आयुक्त संतोष रस्तोगी, पूर्व प्रादोशिक विभागाचे अपर पोलीस आयुक्त लखमी गौतम यांच्यासह खंडणी विरोधी पथकाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.
दरम्यान, गोळीबाराप्रकरणी विक्रोळी पोलीस स्थानकात कलम 307, 452 भादविसह 3, 25 व 5, 27 हत्यार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आणि खंडणीविरोधी पथकाने तपास सुरू केला. गोळीबार करणाऱ्या आरोपीकडून जप्त करण्यात आलेले .32 रिव्हॉल्वरद कानपूरच्या कारखान्यात तयार झाल्याचे निदर्शनास आले. यानंतर खंडणीविरोधी पथकाने तीन पथके ठाणे, मध्यप्रदेश आणि कर्नाटक येथे रवाना झाली.
Mumbai Police Crime Branch has arrested two accused for allegedly attempting to murder Shiv Sena leader Chandrashekhar Jadhav.
— ANI (@ANI) December 25, 2019
पथकांनी मध्यप्रदेशमधून कृष्णधर सिंह आणि ठाण्यातून आनंद फडतरे यास ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्यांनी (कृष्णधर संग आणि सागर मिश्रा) विदेशातील गँगस्टर प्रसाद पुजारी याच्या सांगण्यावरून हा हल्ला केल्याचे सांगितले. प्रसाद पुजारी याच्या सांगण्यावरून ते मुंबईत आले. येथे आनंद फडकरे याने विना नंबरची बाईक त्यांना पुरवली. यानंतर सागर मिश्रा याने चंद्रशेखर जाधव यांच्यावर गोळीबार केला. मात्र या खून हल्ल्यामागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.




























































