आंदोलन करून काय मिळालं? आंदोलकांना मोदींचा सवाल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
pm-modi-new

नागरिकत्व कायद्याच्या विरोधातील आंदोलनात हिंसाचार घडवला, ज्यांनी सरकारी मालमत्तेचे नुकसान केले आहे त्यांनी आपण केले ते योग्य होते का, असा प्रश्न स्वत:लाच विचारावा. त्यांची कृती योग्य होती का, आंदोलन करून काय मिळालं, असा सवाल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे. लखनौमध्ये अटलबिहारी वाजपेयी मेडिकल युनिव्हर्सिटीचे भूमिपूजन करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.

चांगले रस्ते, सुविधा आणि सांडपाण्याची योग्य व्यवस्था हा नागरिकांचा हक्क आहे, तर त्यांची योग्य काळजी घेणे आपलीही जबाबदारी आहे असे सांगत पंतप्रधान मोदी यांनी सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात रस्त्यावर उतरून हिंसाचार करणाऱयांनी सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करू नये अशी विनंती केली.

जे उद्ध्वस्त केले ते त्यांच्या मुलाबाळांच्या उपयोगी पडले नसते का? हिंसक आंदोलनात काही नागरिकांचा मृत्यू झाला, काही जण जखमी झाले. तसेच काही पोलीसही जखमी झाले. त्यांच्या कुटुंबीयांचा कधी विचार केला का, असे प्रश्न करत मोदी यांनी आंदोलकांना त्यांच्या जबाबदारीची आठवण करून दिली.

पुढील काळात कठोर निर्णय घेण्याचे संकेत
कलम 370, राममंदिराचा मुद्दा शांततेच्या मार्गाने सोडवण्यात आला आहे. पाकिस्तान, बांगलादेश, अफगाणिस्तानमधील निर्वासितांना कशा पद्धतीने नागरिकत्व द्यायचे याचा मार्ग मोकळा झाला आहे. देशातील 130 कोटी जनता नेहमीच अशा आव्हानांना आत्मविश्वासाने सामोरे गेल्याचे सांगत, पंतप्रधान मोदी यांनी केंद्र सरकार यापुढील काळात मोठे आणि कठोर निर्णय घेण्याचे संकेत त्यांनी दिले.