
ठाकुर्ली रेल्वे स्थानकातील नवीन पादचारी पुलाचे गर्डर बसवण्यासाठी आज मध्य रेल्वेने हाती घेतलेली मोहीम फत्ते झाली. वेळेआधीच काम पूर्ण झाल्याने चार तासांचा विशेष पॉवर ब्लॉक तीन तासांतच संपला. मात्र पिकअवर्समधील तीन तासांत कल्याण-डोंबिवलीदरम्यान एकही लोकल न धावल्याने प्रवाशांच्या सहनशीलतेचा अक्षरश: कडेलोट झाला. कल्याण, डोंबिवली, बदलापूर, कर्जत, कसारा स्थानकात प्रवाशांची तुडुंब गर्दी झाली. तुफान रेटारेटीने जीव मेटाकुटीस आला. फलाटावर उभे राहायला जागा नसल्याने प्रवासी रुळावर उतरले. मस्टरवरचा लेट मार्वâ चुकवण्यासाठी नोकरदारांनी रिक्षाचा आधार घेतला, पण कल्याण-डोंबिवली शेअरिंग ३० रुपये असताना शंभर ते दीडशे रुपये रिक्षाचालकांनी उकळले. सकाळी १० पासून दुपारी १ वाजेपर्यंत हे ‘पॉवर ब्लॉक’चे ‘गोंधळ आख्यान’ सुरूच होते.
इंडियन रेल्वे स्टेशन डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन आणि एमयूटीपी ३ च्या माध्यमातून ठाकुर्ली स्थानकाचा पुनर्विकास केला जात आहे. प्रवाशांना विविध सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत. याचाच भाग म्हणून पूर्व-पश्चिम पादचारी पूल तयार केला जात आहे. आज पुलावर गर्डर बसवण्यासाठी मध्य रेल्वेने चार तासांचा विशेष पॉवर ब्लॉक घेतला. रेल्वे प्रशासनाने दोन दिवसांपूर्वीच एक्सप्रेस, मेल, लोकल सेवेचे वेळापत्रक जाहीर केले होते. यानुसार कल्याण-डोंबिवली मार्गावर सकाळी ९.४५ ते दुपारी १.४५ एकही लोकल धावली नाही. रेल्वेने नियोजित वेळेच्या ५० मिनिटे आधीच गर्डर बसवण्याचे काम पूर्ण केले असले तरी प्रवाशांना मात्र मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागले. दुपारी चारनंतर लोकल सेवा पूर्वपदावर आली.
केडीएमटीचा आधार
पॉवर ब्लॉकमुळे प्रवासी वर्गाचे मोठे हाल झाले. रिक्षाचालकांनी एकीकडे वारेमाप भाडे आकारण्यास सुरुवात केली असताना कल्याण – डोंबिवली महानगरपालिकेच्या परिवहन सेवेने मात्र प्रवाशांना मदतीचा हात दिला. कल्याण – डोंबिवली मार्गावर केडीएमटीच्या २५ बसेस दिवसभर धावत होत्या.
– कल्याण, ठाकुर्ली येथून प्रवाशांनी बस, रिक्षा तर काही प्रवाशांनी चालत येऊन डोंबिवली स्थानक गाठले. येथून सीएसएमटी मार्गावर दर २० मिनिटांनी लोकल सोडण्याचे रेल्वे प्रशासनाने जाहीर केले होते, मात्र रेल्वेच्या टाइमटेबलचा पुरता बोजवारा उडाला. जवळपास १ ते २ तासांनी लोकल सोडल्या जात होत्या. यामुळे सर्वच स्थानकांवर प्रचंड गर्दी झाली होती. त्यातच गाडीत जागा मिळवण्यासाठी मुंब्रा, दिवा, कोपर येथून उलट्या दिशेने प्रवासी बसून येत होते. परिणामी डोंबिवलीकरांना गाडीत चढताच येत नव्हते. यामुळे प्रवाशांमध्ये उद्रेक झाला. डोंबिवली स्थानक प्रमुख अब्राहम यांना प्रवाशांनी घेराव घालून याचा जाब विचारला. गर्दीला नियंत्रणात आणण्यासाठी रेल्वे पोलीस, रेल्वे सुरक्षा बल, शहर पोलीस, वाहतूक पोलिसांना मोठी कसरत करावी लागली.
नागरकोईल एक्सप्रेसचा टाटा
अनेकांनी लांबपल्ल्याच्या गाड्यांची तिकिटे काढली होती. कल्याणला थांबा असलेल्या नागरकोईल एक्सप्रेसला आज ठाण्यात थांबा दिला होता. ही गाडी पकडण्याची प्रवासी धडपड करत होते. 12 वाजून 10 मिनिटांनी सीएसएमटीवरून सुटलेली गाडी ठाण्यात येऊन पोहोचली तरी लोकलसेवेचा बोजवारा उडाल्याने प्रवासी डोंबिवलीतून ठाण्यात पोहोचले नव्हते. गाडी पकडण्यासाठी अनेकांनी खासगी वाहने करून ठाणे आणि कर्जत स्थानक गाठले. मात्र अनेकांना ही गाडी मिळालीच नाही.
पहिला ग्रीन सिग्नल राजधानीला
गर्डर मोहीम फत्ते झाल्यानंतर कल्याणहून मुंबईच्या दिशेने दुपारी २ वाजता राजधानी एक्स्प्रेस ही पहिली गाडी निघाली. यानंतर कल्याणच्या दिशेने दुरांतो एक्सप्रेस सोडण्यात आली. यापाठोपाठ दोन्ही दिशेने लोकल गाड्या सुरू करण्यात आल्या. ४ वाजल्यानंतर लोकलसेवा पूर्वपदावर आली.
टीम मध्य रेल्वेची एकजूट
ठाकुर्ली येथे पादचारी पुलावरील गर्डर मोहिमेसाठी अधिकारी – कर्मचारी असा १५० जणांचा ताफा होता. या टीमने तीन तासांत ६ मीटर रुंदीचे आणि ४०० मेट्रिक टन वजनाचे ४ गर्डर यशस्वीपणे पादचारी पुलावर बसवले. वरिष्ठ विभागीय अभियंता डी. डी लोलगे, विभागीय इलेक्ट्रिकल अभियंता श्री रमेश यांच्या देखरेखीखाली ही मोहीम फत्ते झाली.




























































