तीन महिन्यांत मुंबईतील 50 रस्ते चकाचक करणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
bmc-2

मुंबईतील 50 रस्त्यांचा येत्या तीन महिन्यांत कायापालट होणार आहे. यामध्ये फुटपाथ, पार्किंग, सायकल ट्रक आणि दर्जेदार टिकावू रस्ते बनवण्यात येणार आहेत. या उपक्रमात सर्व 24 वॉर्डमधील प्रत्येकी दोन रस्त्यांची निवड केली जाणार असून तीन किमीपर्यंत मार्गाची दुरुस्ती, सुधारणा आणि सौंदर्यीकरण करण्यात येणार आहे. मुंबईतील वाहतूक व्यवस्था सुधारणा करण्यासाठी आणि मुंबईकरांचा प्रवास सुखकारक करण्यासाठी पालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांनी हा निर्णय घेतला आहे.

मुंबईतील वाहतूक व्यवस्थेच्या सुधारणेसाठी पालिकेच्या माध्यमातून अनेक उपाययोजना करण्यात येत आहेत. यामध्ये वाहतूककोंडी सोडवण्यासाठी बेकायदा पार्किंगवर पाच ते दहा हजारांचा दंड आकारण्यास सुरुवात करण्यात आली आहे. शिवाय रस्ता सुरक्षेसाठी ‘स्ट्रिट लॅब’ उपक्रमाच्या माध्यमातून स्वामी विवेकानंद रोड, नेपियन्सी रोड, विक्रोळी पार्कसाईट मार्ग क्रमांक 17, मौलाना शौकत अली रोड आणि राजाराम मोहन रॉय रोड या पाच रस्त्यांच्या सुधारणा कामास सुरुवात करण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबईतील प्रत्येक विभागात दर्जेदार रस्ते देण्यासाठी रस्ते सुधारणा उपक्रम राबवण्यात येणार आहे. यामध्ये नियोजित 50 रस्त्यांचे काम येत्या तीन महिन्यात पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आल्याची माहिती पालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांनी दिली.

दुरुस्ती, सुधारणा आणि सौंदर्यीकरण होणार

रस्त्यांच्या सुधारणा कार्यक्रमात दुरुस्ती, सुधारणा आणि सौंदर्यीकरणाचे काम केले जाणार आहे. यामध्ये मुंबईतील रस्ते आणि फुटपाथसह पूर्व-पश्चिम द्रुतगतीमार्ग डेब्रीजमुक्त करणे, रस्ते दुभाजक बसवणे, नामफलक लावणे आणि रस्ते, विभाग स्तरावर अतिक्रमणे हटवणे, बेकायदेशीर जाहिरात फलक हटवणे, फुटपाथ आकर्षक बनवण्याचे काम केले जाणार आहे. यामध्ये अतिक्रमणांवर कारवाई करण्यासाठी पोलीस बंदोबस्त देण्याबाबत पोलीस खात्याने मान्यही केले आहे.

असे होणार काम

दर्जेदार वाहतूक व्यवस्थेसाठी पालिकेने ‘स्ट्रीट लॅब’ उपक्रमाच्या माध्यमातून नगररचनाकारांकडून वाहतूक व्यवस्थेसाठी डिझाइन मागवले होते. यातील विजेत्या डिझाइनच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय दर्जाचे रस्ते बनवण्याचे काम सुरू आहे. या पार्श्वभूमीवर नव्याने 50 रस्त्यांच्या कामासाठी निविदा मागवून तातडीने काम केले जाणार आहे. यामध्ये टप्प्याटप्प्यावर असणाऱया जंक्शनच्या सौंदर्यीकरणाचे कामही केले जाणार आहे.
असा होईल एस.व्ही. रोड

  • नगररचनाकारांकडून वाहतूक व्यवस्थेसाठी डिझाईन मागवले होते. यातील विजेत्या डिझाईनच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय दर्जाचे रस्ते बांधले जातील.

पाच हजार सीसीटीव्ही बसवणार

मुंबईतील वाहतूक व्यवस्था आणि सुरक्षेसाठी पोलीस, वाहतूक विभाग आणि पालिकेच्या माध्यमातून आतापर्यंत पाच हजार सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. यामध्ये आगामी काळात पालिका पोलीस, वाहतूक विभागाच्या माध्यमातून रस्ता सुधारणेच्या कामात मुंबईत पुढील तीन महिन्यांत आणखी पाच हजार सीसीटीव्ही कॅमेरे बसवणार आहे.