
अन्यायाविरुद्ध शांततापूर्ण मार्गाने निदर्शने करणे हा विद्यार्थ्यांचा हक्क कुणीही नाकारू शकत नाही. पण ‘खोटे’ पसरवणारी शक्ती आणि समाजकंटकांच्या नादाला लागून विद्यापीठात आणि महाविद्यालयात जाळपोळ, तोडफोड करणारे विद्यार्थी कधीही चांगले ‘नेते’ होऊ शकत नाहीत. समाजाला, देशाला विकासाची, प्रगतीची आणि बंधुत्वाची दिशा दाखवतो तोच खरा नेता म्हणायला हवा, अशा शब्दांत लष्करप्रमुख जनरल बिपिन रावत नागरिकत्व संशोधन कायदाविरोधी आंदोलनात हिंसाचार करणाऱ्या जामिया मिलिया, अलिगढ मुस्लिम विद्यापीठ व आसामातील विद्यार्थी संघटनांवर आज बरसले.
नागरिकत्व सुधारणा कायद्याला (सीएए) शांततापूर्ण विरोध आपला समजू शकतो, पण गेल्या काही दिवसांत सीएएविरोधी आंदोलनाच्या माध्यमातून देशातील काही विद्यापीठे व महाविद्यालये हिंसाचाराची केंद्रे बनली आहेत. सीएएविरोधाच्या मुद्दय़ावरून विद्यार्थ्यांनी स्वतःच्याच महाविद्यालयाची तोडफोड करणे, विद्यापीठात जाळपोळ करून सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणे या गोष्टी समाज आणि देशहिताला घातकच आहेत, त्याचे समर्थन होऊच शकत नाही असे परखड प्रतिपादन 31 डिसेंबरला सेवानिवृत्त होणारे लष्करप्रमुख जनरल बिपिन रावत यांनी केले आहे.
लष्करप्रमुख आपल्या वक्तव्याने पंतप्रधान मोदी यांनाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करीत आहेत. कारण आणीबाणीच्या काळात नरेंद्र मोदी यांनीही विद्यार्थी नेते म्हणून आंदोलने, निदर्शनात सहभाग घेतला होता- अससुद्दीन ओवेसी, एमआयएम अध्यक्ष
‘जनरल रावतसाहेब मी तुमच्या म्हणण्याशी पूर्ण सहमत आहे, पण जे आपल्या अनुयायांना जातीय हिंसा भडकवायला परवानगी देतात तेही नेते म्हणून घ्यायला लायक नाहीत- दिग्विजय सिंह, काँग्रेस नेते






















































