
विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन भाजपवासी झालेले माजी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या घरवापसीची सध्या चर्चा सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर आज विखे-पाटील यांनी स्वतः खुलासा केला असून मी भाजपमध्येच राहणार असल्याचे म्हटले आहे.
काँग्रेसमध्ये असताना आपण पक्षाची भूमिका प्रभावीपणे राबवली होती. मात्र काही अडचणींमुळे मी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला. आता मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व मान्य केले आहे. त्यामुळे पुन्हा काँग्रेसमध्ये जाण्याचा प्रश्नच उद्भवत नसल्याचे विखे-पाटील यांनी स्पष्ट केले आहे. माझी आणि काँग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खरगे यांची भेट झालेली नाही. मात्र माझी बदनामी करण्यासाठी अशा बातम्या पसरवल्या जात आहेत. त्याविरोधात गुन्हा दाखल करणार असल्याचे विखे-पाटील यांनी म्हटले आहे.























































