
>> संजय मिस्त्री
डेव्हिड लो हा जगप्रसिद्ध व्यंगचित्रकार मूळचा न्यूझीलंडचा. नंतर तो इंग्लंडला स्थायिक झाला. त्याच्या व्यंगचित्रांचा प्रभाव अर्ध्या जगावर होता. त्या प्रभावातून घडले ‘शंकर्स विकली’चे शंकर पिल्ले, ‘मार्मिक’चे बाळासाहेब ठाकरे आणि आर. के. लक्ष्मण.
त्याअगोदर महाराष्ट्रात, देशांत हास्यचित्रे प्रसिद्ध होत होती, पण राजकीय व्यंगचित्रे फार कमी प्रसिद्ध होत. हिंदू पंचमधून ती होत असत. राजकीय व्यंगचित्रकलेचे वेड बाळासाहेब ठाकरे, शंकर, आर. के. लक्ष्मण यांनी लावले. ‘मार्मिक’ व्यंगचित्र साप्ताहिक निघाल्यानंतर अख्ख्या महाराष्ट्राला बाळासाहेबांच्या व्यंगचित्रांनी वेड लावले.
यामध्ये विकास सबनीस एक. विकास सबनीस यांचे वडील ल. शं. सबनीस ‘मार्मिक’चे नियमित लेखक. त्यावेळी ‘मार्मिक’चे काम मा. प्रबोधनकार पाहायचे. दिवाळी अंकासाठी कथा पाठविण्याविषयीचे पत्र त्यांनी ल. शं. सबनीस यांना पाठविले. ते पत्र विकास सबनीस यांच्या हाती लागले व ते आपली काही व्यंगचित्रे घेऊन प्रबोधनकारांच्या भेटीला गेले. दादांनी ती व्यंगचित्रे पाहून विचारलं, ‘‘तू कशाने व्यंगचित्र काढतोस?’’ विकास सबनीस म्हणाले, ‘‘ब्रशने!’’ त्यावर दादा म्हणाले, ‘‘हरकत नाही. मग तू ‘मार्मिक’चं काम करू शकशील.’’ अशा तऱहेने विकास सबनीस यांची व्यंगचित्रं ‘मार्मिक’ मध्ये प्रसिद्ध होऊ लागली.
‘मार्मिक’मध्ये पहिले व्यंगचित्र प्रसिद्ध होताच विकास सबनीस यांनी ‘मार्मिक’मधल्या बाळासाहेबांची व्यंगचित्रे नियमित पाहण्याचा सपाटाच चालू केला आणि हळूहळू ब्रशवर प्रचंड हुकुमत मिळविली. एवढी की बाळासाहेबांनी ‘मार्मिक’चे मुखपृष्ठ व ‘रविवारची जत्रा’ करण्याची जबाबदारी तब्बल दहा वर्षे सोपविली. सबनीसांनी ती व्यवस्थित सांभाळली.
राजकीय व्यंगचित्रकला हळूहळू अस्ताला चालली आहे. विकास सबनीस या राजकीय व्यंगचित्रकाराच्या जाण्याने तर त्याला दुजोरा मिळतोय.
राजकीय व्यंगचित्रकलेचे एक गणित आहे. ते राजकारणाचा व्यवस्थित अभ्यास केल्याशिवाय शक्य होत नाही. बाळासाहेबांची व्यंगचित्रेही विद्यापीठाचं काम करतात. प्रचंड व्यासंग आणि ध्यास असल्याशिवाय राजकीय व्यंगचित्रकार होणं कठीण आहे, पण विकास सबनीस यांना ते जमलं होतं. बाळासाहेबच नव्हे तर संपूर्ण ठाकरे कुटुंब सबनीसांचा विक पॉइंट होता. स्वतःच्या व्यंगचित्रांपेक्षा सबनीस बाळासाहेबांच्या व्यंगचित्रांबद्दल बोलायला लागले की, त्यांचं संपूर्ण शरीरच भारावून जाई.
बाळासाहेबांच्या एकेका रेषेचा त्यांचा अभ्यास होता. ‘पॉकेट कार्टून’ काढताना बाळासाहेब ज्या आकारात काढत त्याच आकारात ते काढत. बाळासाहेब पाइप ओढत म्हणून काही वर्षांपूर्वी त्यांनी पाइपही ओढायला सुरुवात केली होती. इतके ते ‘बाळासाहेबमय’ होऊन गेले होते.
आम्हाला बाळासाहेबांची भेट हवी असेल तर सबनीस यांना सांगत असू. सबनीस ‘मातोश्री’वर फोन करीत. एवढेच नव्हे तर स्वतः आमच्यासोबत आपलं काम बाजूला ठेवून येत असत. व्यंगचित्रकार आणि बाळासाहेब यांच्यातला दुवा विकास सबनीस होते. कुटुंबावर, मित्रांवर, आपल्या कलेवर, व्यंगचित्रांवर प्रेम करणारा माणूस म्हणजे विकास सबनीस.
फक्त व्यंगचित्रकलेवर पन्नास वर्षे उपजीविका करणे सोपी गोष्ट नव्हे. पण आपल्या व्यंगचित्रकलेतील आत्मविश्वासावर त्यांनी तो पल्ला गाठला होता. मला त्यांचं विशेष कौतुक यासाठी वाटतं की, बाळासाहेब ठाकरे, आर. के. लक्ष्मण हे दिग्गज व्यंगचित्रकार कार्यरत असताना त्यांनीही यशस्वी कारकीर्द केली आणि एक दखल घेण्याजोगा राजकीय व्यंगचित्रकार म्हणून ‘ठसा’ उमटविला!




























































