
विद्यार्थीदशेतच प्रतिभावान कबड्डीपटूंना हेरून त्यांना योग्य ते प्रशिक्षण देऊन राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय कबड्डी स्पर्धांसाठी तयार करण्यासाठी शीव येथील शिव शिक्षण संस्थेचे डी. एस. हायस्कूल आणि ‘युवा पुणेरी पलटण’ यांनी एका आगळ्यावेगळ्या उपक्रमाची आखणी केली आहे. या उपक्रमाअंतर्गत राज्यातील 16 ते 20 वयोगटातील कबड्डीपटूंना डी. एस. हायस्कूलमध्ये ‘युवा पुणेरी पलटण’चे तज्ञ मार्गदर्शक प्रशिक्षण देणार आहेत.
प्रो-कबड्डी लीगसाठी गुणवान कबड्डीपटू हेरण्यासाठी तसेच त्यांना प्रशिक्षित करण्यासाठी ‘युवा पुणेरी पलटण’ची स्थापना करण्यात आली. दोन महिन्यांपूर्वी म्हणजे नोव्हेंबरपासून डी. एस. हायस्कूलमध्ये सुरू झालेल्या या उपक्रमाविषयी अधिक माहिती देताना ‘युवा पुणेरी पलटण’चे मुख्य कार्यकारी अधिकारी कैलाश कांडपाल म्हणाले, मुंबई, पुणे, कोल्हापूर तसेच महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातून प्रतिभावान युवा कबड्डीपटू शोधून त्यांना प्रो-कबड्डी लीगसाठी प्रशिक्षित करण्याचा आमचा हेतू आहे. खेळाडूंच्या आहाराकडे तसेच नियमित सराव आणि प्रशिक्षणावर आम्ही विशेष भर दिला आहे. आठवडय़ातील दोन दिवस ‘मॅट’वर तर तीन दिवस मातीवर आम्ही कबड्डीचा सराव देणार आहेत.
तीन वर्षे रंगतोय ‘लेटस् गेट फिट’
डी. एस. हायस्कूलमध्ये गेल्या तीन वर्षांपासून ‘लेटस् गेट फिट’ हा उपक्रम राबवला जात आहे. याअंतर्गत शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त क्रीडा प्रशिक्षक अमृता कारखानीस यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांना विविध क्रीडा-खेळाच्या स्पर्धांसाठी तयार केले जाते. गेली दोन वर्षे शालेय स्तरावरील कबड्डी स्पर्धांमध्ये डी. एस. हायस्कूलचे विद्यार्थी विशेष कामगिरी बजावत आहेत. डी. एस. हायस्कूलचे अध्यक्ष राजेंद्र प्रधान यांनी सांगितले की, कबड्डी हा एक अस्सल हिंदुस्थानी क्रीडा प्रकार आहे. पूर्वीच्या तुलनेत आज कबड्डीमध्ये करीअरच्या अनेक संधी निर्माण झाल्या आहेत. त्या संधीचा लाभ उठवायचा असेल तर विद्यार्थ्यांना योग्य वयातच चांगले प्रशिक्षण उपलब्ध व्हायला हवे. ‘युवा पुणेरी पलटण’च्या माध्यमातून शाळेच्या कबड्डी संघातील विद्यार्थ्यांना तज्ञ प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली सरावाची संधी मिळत आहे. शाळेचे विद्यार्थी या संधीचे सोने करतील याची खात्री आहे.



























































