
मुंबईच्या दमट हवामानात थंडगार एसीची झुळूक देणारी पहिली वातानुकूलित लोकल पश्चिम रेल्वेवर धावली त्यास नाताळच्या सणाला 25 डिसेंबरला बरोबर दोन वर्षे पूर्ण झाली. चर्चगेट ते विरार अशा दिवसभरात 12 फेर्या जरी या एसी लोकलच्या होत असल्या तरी त्यातील केवळ दोन फेर्या गर्दीच्या पिकअवरमध्ये होत असूनही या लोकलने दोन वर्षांत 95.81 लाख प्रवाशांद्वारे 40.03 कोटींची कमाई केली आहे.
पश्चिम रेल्वेवर देशातील पहली ब्रॉड गेज मार्गावरील उपनगरीय एसी लोकल 25 डिसेंबर 2017 रोजी सुरू झाली. एसी लोकलचे भाडे फर्स्ट क्लासच्या 1.3 पटीने जादा असल्याने या लोकलमुळे साध्या लोकलच्या 12 फेर्या वाया गेल्याने प्रवाशांनी आधी विरोध केला. परंतु हळूहळू या लोकलला चांगला प्रतिसाद मिळू लागला आहे. पश्चिम रेल्वेवर आणखी चार एसी लोकल दाखल झाल्या आहेत. या गाडीचे मेंटेनन्स करण्यासाठी तिला शनिवारी आणि रविवारी सुट्टी दिली जायची. त्यामुळे सुरुवातीला सोमवार ते शुक्रवार धावणारी लोकल आता शनिवार आणि रविवारीदेखील धावत असल्याने मुंबईत पर्यटनासाठी येणार्या प्रवाशांची संख्या मोठी असल्याने एसी लोकलचे प्रवसी वाढले आहेत. या वातानुकूलित लोकल ट्रेनच्या प्रत्येक डब्यात ऑटोमेटिक डोअर क्लोजिग सिस्टम, टॉक बॅक सिस्टम तसेच अग्निशमन उपकरणासारख्या अत्याधुनिक सुविधा आहेत.



























































