लातूरच्या पानगावात शेतातील आखाड्यावर दरोडा; सालगडी आणि त्याच्या पत्नीला मारहाण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

लातूरच्या रेणापूर तालूक्यातील मौजे पानगाव शिवारातील शेतातील आखाड्यावर दरोडा टाकण्यात आला. वयोवृध्द सालगडी व त्याच्या पत्नीस मारहाण करण्यात आली. त्यांच्याजवळील मोबाईल, रोख रक्कम, सोन्याचे दागीने पळवण्यात आले. या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात चारजणांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.

बायनाबाई अमृत पवार (वय 60) या वृध्देने या प्रकरणी रेणापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पानगाव येथील रणजितसिंह गणपतसिंह चौहान यांच्या शेतात ते सालगडी म्हणून एक वर्षांपासून काम करत आहेत. रविवारी रात्री 2 वाजण्याच्या सुमारास तक्रारदार शेतातील आखाड्यावरील पत्र्याच्या शेडमध्ये झोपल्या होत्या. त्यांचे पती पत्र्याच्या शेडबाहेर झोपले होते. शेडच्याबाहेर झालेल्या आवाजाने त्या उठल्या आणि दार उघडले असता अचानक दोघेजण शेडमध्ये आले त्यांनी काठीने डोक्यात, हातावर मारहाण केली. त्यांच्या कानातील 2 ग्रॅमची सोन्याची फुले, 5 ग्रॅमचे मणीमंगळसूत्र, नाकातील एक ग्रॅमचे सोन्याचे बेलपान, दोन्ही पायातील चांदीचे जोडवे काढून घेतले. त्यांच्या अंगावर तांबड्या व काळ्या रंगाचे बनियन आणि अंगात काळ्या पॅन्ट होत्या. शेडच्या बाहेर त्यांच्या पतीजवळ दोघे थांबलेले होते त्यांनी तक्रारदाराच्या नवऱ्यास काठीने मारहाण केली. त्यांच्याजवळचा मोबाईल काढून घेतला. कोणाला सांगीतले तर ठार मारण्याची धमकी दिली. दरोडेखोरांच्या मारहाणीत जखमी झालेल्या तक्रारदार व त्यांच्या पतीला पानगाव येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी पोलिसांनी पाठवले आहे. या प्रकरणी चार अज्ञात दरोडेखोरांवर पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे.