ऑस्ट्रेलियातील जंगलांमध्ये अग्नितांडव, चार हजाराहून अधिक पर्यटक अडकले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधीक फोटो

गेल्या काही महिन्यांपासून ऑस्ट्रेलियातील जंगलांमध्ये धुसफूसणाऱ्या आगीने भीषण रुप धारण केले असून ही आग आता समुद्र किनाऱ्यावर वसलेल्या मल्लकूटा शहरात पोहोचली आहे. पर्यटकांचे आवडते पर्यटनस्थळ असलेल्या मल्लकूटा शहरात पर्यटनासाठी आलेले तब्बल तीन हजार पर्यटक आगीत अडकले असून त्यांना सुखरुप बाहेर काढण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. मात्र सातत्याने हवामानात होणारा बदल आणि जोरदार हवेमुळे आग पसरत असल्याने बचाव कार्यात अडथळे येत असल्याचे सांगण्यात आले आहे.

तर दुसरीकडे सुट्टी घालवण्यासाठी ऑस्ट्रेलियात आलेल्या तीस हजार पर्यटकांना लवकरात लवकर सुरक्षितस्थळ गाठण्याचे आवाहन ऑस्ट्रेलियन सरकारने केले आहे. याबद्दल बोलताना व्हिक्टोरिया येथील आपातकालिन विभागाचे ज्येष्ठ अधिकारी अॅड्र्यू क्रिस्प यांनी सांगितले की मल्लकूटा येथे तीन दल तैनात असून समुद्र किनाऱ्यावर चार हजार पर्यटकांची सोय करण्यात आली आहे. पण जंगलात आग वेगात पसरत असल्याने अनेक पर्यटक भरकटले आहेत. त्यांना शोधून काढणे हे बचाव पथकापुढे मोठे आव्हान आहे. न्यू साऊथ वेल्स येथील गावांमध्ये आग वेगाने पसरत आहे. तर ताशी 100 किलोमीटर वेगाने वारे वाहात असल्याने येथील तीस हजार नागरिकांना सुरक्षितस्थळी जाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.