
संपूर्ण देश मंगळवारी नववर्षाच्या स्वागताच्या जल्लोषात दंग असतानाच उत्तर प्रदेश मात्र एका प्रख्यात कुटुंबाच्या हत्याकांडाने हादरले. आंतरराष्ट्रीय भजन गायक अजय पाठक, त्यांची पत्नी स्नेहा, मुलगी वसुंधरा (12) आणि मुलगा भागवत (10) यांची अज्ञातांकडून धारदार शस्त्राने गळा चिरुन हत्या करण्यात आल्याचे समोर आले. या घटनेमुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, काही तासातच या हत्याकांडाशी संबंधित असल्याच्या संशयावरुन एकाला अटक करण्यात आली आहे.
येथील शामली येथे पाठक कुटुंब राहते. शेजाऱ्या पाजाऱ्यांशी त्यांचे मैत्रीपूर्ण संबंध होते. यामुळे त्यांचे कोणाशी वैमनस्य असण्याची शक्यता नसल्याचे त्यांच्या कुटुंबीयांकडून सांगण्यात येत आहे. दरम्यान, पाठक यांचा 10 वर्षांचा मुलगा भागवत रहस्यमयरित्या बेपत्ता झाला होता. पण बुधवारी घरात त्याचाही मृतदेह सापडल्याने या हत्याकांडाचे गूढ अधिकच वाढले आहे. या हत्याकांडामागील मुख्य सूत्रदारास शोधून काढणे हे पोलिसांसमोर मोठे आवाहन असणार आहे. दरम्यान, या घटनेची माहिती कळताच पोलिसांचे एक पथक तात्काळ घटनास्थळी पोहचले.




























































